
आठ जणांविरोधात गुन्हा दाखल ; तिघांना अटक
नागपूर : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाकडून कारवाया केल्या जातात; पण उपराजधानीत एमडी खरेदी-विक्रीचे प्रमाण थांबण्याचे नाव नाही. पथकाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी केलेल्या कारवाईत तब्बल ९० लाखांची एमडी पावडर जप्त केली. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपींमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या एका सुपरवायझरचादेखील समावेश आहे. त्याच्याविरोधात अगोदरदेखील ‘एनडीपीएस’ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. कपिल गंगाधर खोब्रागडे असे आरोपी सुपरवायझरचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली.
हिवरीनगर परिसरात एमडीची खरेदीविक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला व हिवरीनगर बगिच्यासमोरील लोहाना भवनाजवळ कपिल गंगाधर खोब्रागडे (४०, रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी, आंबेडकर चौक), राकेश अनंतराव गिरी (३१, रा. नंदनवन झोपडपट्टी) व अक्षय बंडू वंजारी (२५, रा. जुना बगडगंज, बजरंगनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळून ९०.७० लाख रुपये किमतीची ९०७ ग्रॅम एमडी पावडर आढळली. पोलिसांनी त्यांच्याकडून चार मोबाइल व वजनकाट्यासह ९१.१८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कपिल हा मनपाच्या आरोग्य विभागात सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. त्याच्याविरोधात एनडीपीएस अंतर्गत अगोदर एक गुन्हा दाखल आहे. राकेशविरोधातदेखील दोन गुन्हे दाखल आहेत.
अक्षय हा कुख्यात गुंड असून त्याच्याविरोधात एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. त्यात एक एनडीपीएसचा गुन्हा आहे. या खरेदीविक्रीच्या रॅकेटमध्ये मध्यप्रदेशातील सारंगपूर येथील सोहेल, टेका ताजनगरमधील मकसूद अमीनुद्दीन मलिक, हिवरेनगर येथील गोलू बोरकर, हिंगण्यातील अक्षय बोबडे व अल्लारखा हेदेखील सहभागी आहेत. त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे. मकसूद हा सराईत ड्रगडीलर आहे. त्याच्याविरोधात एकूण १४ गुन्हे दाखल असून पाच गुन्हे ‘एनडीपीएस’ अंतर्गत आहेत.
पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने, मनोज नेवारे, पवन गजभिये, शैलेश डोबोले, रोहित काळे, राहुल पाटील, शेषराव रेवतकर, सुभाष गजभिये व सहदेव चिखले यांच्या पथकाने ही कारवाई केली.



