गडचिरोलीविदर्भ

गडचिरोलीत होणार पोस्ट विभागाचे स्वतंत्र विभागीय कार्यालय व हेड पोस्ट ऑफिस ; खा. डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रयत्नांना यश

४२ वर्षांची प्रतीक्षा संपली; जिल्ह्याला मिळणार टपाल सेवांमध्ये स्वायत्तता, नागरिकांना मोठा दिलासा

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आता गडचिरोली येथे पोस्ट विभागाचे स्वतंत्र विभागीय कार्यालय आणि हेड पोस्ट ऑफिस स्थापन करण्यास अखेर मान्यता मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील नागरिक, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची ही दीर्घकाळ प्रलंबित मागणी होती, जी खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि अथक प्रयत्नांमुळे पूर्णत्वास गेली आहे.

गडचिरोली जिल्ह्याची स्थापना होऊन सुमारे ४२ वर्षे पूर्ण झाली असली तरी, आजतागायत येथे स्वतंत्र हेड पोस्ट ऑफिस किंवा पोस्टाचे विभागीय कार्यालय नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना विविध टपाल सेवा, खात्यांशी संबंधित कामकाज तसेच सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यापर्यंत प्रवास करावा लागत असे. यात वेळ, पैसा आणि संसाधनांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत होता.

केंद्र सरकारच्या संप्रेषण मंत्रालयाच्या टपाल संचालनालयाने महाराष्ट्र सर्कलच्या प्रस्तावाला सैद्धांतिक मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार, गडचिरोली एमडीजी (HSG-I) चे हेड पोस्ट ऑफिसमध्ये रूपांतर करण्यात येईल आणि सध्याच्या चंद्रपूर पोस्टल डिव्हिजनचे विभाजन करून नवीन गडचिरोली पोस्टल डिव्हिजन तयार करण्यात येणार आहे.

या ऐतिहासिक बदलामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना आता टपाल सेवांसाठी चंद्रपूरकडे धाव घ्यावी लागणार नाही. जिल्ह्यामध्येच सर्व सेवा उपलब्ध होणार असल्यामुळे ग्रामीण भागांपर्यंत केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होईल.

खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, “गडचिरोलीच्या विकासासाठी हे एक मोठे पाऊल आहे. ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. या निर्णयामुळे जिल्ह्याला टपाल क्षेत्रात स्वतंत्र ओळख मिळेल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button