भंडाराविदर्भ

जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; २२६ आरोग्य संस्थांमध्ये वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम

भंडारा : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भंडारा जिल्ह्यातील सर्व ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १९३ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अशा एकूण २२६ आरोग्य संस्थांमध्ये विविध पर्यावरण संवर्धन व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या विशेष मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण, स्वच्छता अभियान आणि प्लास्टिकमुक्त परिसर निर्मितीवर भर देत नागरिकांना पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.

पर्यावरण हा मानवाच्या आरोग्याशी थेट संबंधित घटक आहे. पर्यावरणीय प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, हृदयरोग, कर्करोग आणि जलजन्य रोगांचा धोका वाढतो. त्यामुळे स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि हरित परिसर हे निरोगी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहेत. हीच बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत परिसर स्वच्छ केला आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले.

या दिनाची पार्श्वभूमी सांगताना स्पष्ट करण्यात आले की, १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या स्टॉकहोम परिषदेत या दिवसाची स्थापना झाली होती. त्यानंतर १९७४ मध्ये “फक्त एक पृथ्वी” या संकल्पनेनेसह पहिला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. हा दिवस निसर्गाच्या रक्षणासाठी लोकांना सक्रिय कृती करण्यास प्रेरित करतो.

वाढते प्रदूषण आणि प्लास्टिकचा वाढता वापर लक्षात घेता पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारणे ही काळाची गरज बनली आहे.

पर्यावरणाचे रक्षण केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता, तो आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनवावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संदीप गजभिये, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सचिन चव्हाण व ‘NPCCHH’ कार्यक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. श्रीकांत आंबेकर यांच्या वतीने संयुक्तपणे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button