क्राईमगोंदियामुख्य बातमीविदर्भ

पोलीस शिपाई पदाचे बोगस नियुक्तीपत्र देणाऱ्या तोतया पोलीसाला अटक

डुग्गीपार पोलिसांची कारवाई 

नोकरी लावून देण्याकरिता उमेदवारांकडून घेतले पैसे

गोंदिया : नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालण्यात येत असल्याचे प्रकार घडत असतानाच छत्रपती संभाजीनगर पोलिस दलात शिपाई पदावर नोकरी लावून देण्याकरिता उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना नियुक्तिपत्र देण्यासाठी आलेल्या तोतया पोलिसाला डुग्गीपार पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि.२३) ग्राम खोडशिवनी येथील रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आली आहे. विलास नारायण गणवीर (६५, रा. किन्ही-मोखे, ता. साकोली, जि. भंडारा) असे आरोपीचे नाव आहे.

शुक्रवारी डुग्गीपार येथील पोलिस हवालदार दीपक खोटेले यांना ग्राम खोडशिवनी रेल्वे स्थानक परिसरात एक व्यक्ती छत्रपती संभाजीनगर पोलिस दलात शिपाई पदावर नोकरी लावून देण्याकरिता उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना नियुक्तिपत्र देणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. ही बाब त्यांनी वरिष्ठांना कळविली व वरिष्ठांच्या निर्देशानुसार फिर्यादी वामन व्यंकटराव भुरे (रा. पालेवाडा) यांच्या मदतीने पोलिस निरीक्षक मंगेश काळे यांच्या नेतृत्वातील पथकाने ग्राम खोडशिवनी येथील रेल्वे स्थानक गाठून परिसरात सापळा लावला. याप्रसंगी त्यांनी आरोपी विलास गणवीर याला ताब्यात घेऊन जेरबंद केले. आरोपी विलास गणवीर याची चौकशी करून त्याच्याकडे असलेल्या बॅगची तपासणी केली असता बॅगमध्ये पोलिस अधिकाऱ्यांची वर्दी, बनावट नेमप्लेट, पोलिस अधिकाऱ्याचे बनावट ओळखपत्र, छत्रपती संभाजीनगर पोलिस भरती उमेदवार प्रवेशपत्र, छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य वैद्यकीय अधिकारी व पोलिस अधीक्षक यांचा शिक्का असलेले कागदपत्र, विद्यार्थ्यांचे मूळ टिसी, मार्कशिट, डोमेसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, जात वैधता प्रमाणपत्र आदी आढळले. त्याच्यावर डुग्गीपार पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम २०४, २०५, ३१९(२), ३१८(४), ६२, ३३६(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विलास गणवीर याला सडक-अर्जुनी येथील प्रथमश्रेणी न्यायालयात हजर केल्यावर त्याला न्यायालयाने बुधवारपर्यंत (दि.२८) पोलिस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक काळे, सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद बांबोळे, पोलिस हवालदार दीपक खोटेले, घनश्याम उईके, पोलिस नायक महेंद्र चौधरी, घनश्याम मुळे यांनी केली.

आरोपी विलास गणवीर याच्यावर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत ८ ते १० गुन्हे दाखल आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button