१८ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

मोहगाव येथील घटना : आत्महत्येचे कारण अस्पष्ट
कोरची : तालुका मुख्यालयापासून दोन किलोमीटर अंतरावर येत असलेल्या मोहगाव येथील एका १८ वर्षीय तरुणीने राहत्या घरातच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता दरम्यान उघडकीस आली. प्रेमी चंद्रभान मडावी रा. मोहगाव असे मृतक तरुणीचे नाव आहे.
प्रेमी मडावी हिने गळफास घेतला तेव्हा ती घरात एकटीच होती. प्रेमी मडावी ही आपल्या आजी सोबत मोहगाव येथील घरात राहत होती. तिला आई-वडील एक बहीण व दोन भाऊ आहेत तिचे आई-वडील व मोठ भाऊ हे छत्तीसगड राज्यातील छुर्या गावात शेती असल्याने वास्तव्यास राहतात. तर धाकटा भाऊ उदरनिर्वाह करिता परराज्यात मोलमजुरीचे काम करतो. प्रेमीचे शिक्षण दोन वर्षांपूर्वी सुटले होते ती मजुरीचे काम करून आजी सोबत मोहगाव येथे राहत होती. सोमवारी दुपारच्या दरम्यान आजी घरी जेवण करण्यासाठी आली तेव्हा प्रेमी ही गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली. त्यानंतर या घटनेची माहिती आजीने नातेवाईकांना देऊन कोरची पोलीस स्टेशन गाठले येथील पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार व अंमलदार यांनी घटनास्थळ गाठून प्रेमीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोरची ग्रामीण रुग्णालयात पाठविला. येथील वैद्यकीय अधिकारी आशिष वीटनकर यांनी शवविच्छेदन करून सोमवारी उशिरा रात्रौ मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. मंगळवारी दुपारी मोहगाव येथे प्रेमीचे अंतिम संस्कार करण्यात आले आहे.
मागील एक आठवड्यापूर्वी प्रेमीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता असे परिसरातील नागरिकांकडून सांगितले जात आहे. परंतु आत्महत्या करण्यामागचे नेमके काय कारण आहे हे अजूनही अस्पष्ट आहे. कोरची पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार हे करीत आहेत.



