जिल्ह्याला चार दिवस ‘येलो अलर्ट’

मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
गडचिरोली : गत पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे. उकाड्याने नागरिकांसह शेतकरी त्रस्त असताना हवामान विभागाने गुरुवारपासून (दि. 29) सलग चार दिवस पावसाचा ‘येलो अलर्ट’ दिला आहे.
जुलै महिन्याच्या 20 तारखेपासून 20-25 दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांचे रोवणी केलेले धानपीक भूईसपाट झाले होते. तर पुरामुळे अनेकांच्या पिकांना मोठा फटका बसला होता. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. अधूनमधून पाऊस येत असल्याने वातावरणात थोडा गारवा होता. मात्र मागील पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने त्यातच कडक ऊन पडत असल्याने प्रचंड उकाडा जाणवत आहे. त्यातच शेतजमिनीला पावसाअभावी भेगा पडल्या आहेत. तर नुकतेच रोवणी केलेले धानपीक कोमेजले आहेत. दरम्यान, हवामान विभागाने 29 ऑगस्टपासून 1 सप्टेंबरपर्यंत पावसाचा येलो अलर्ट दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 29 व 30 ऑगस्ट रोजी एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस तर 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर रोजी एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.



