
गडचिरोली : बौद्ध समाज सुज्ञ समाज असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या आदर्शावर चालणारा समाज आहे. परंतु मागील काही कालावधीमध्ये देशातील सरकार संविधान बदलविणार अशा पद्धतीचा अपप्रचार आपल्या समाजात करण्यात आला होता. परंतु तो पूर्णतः खोटा असून संविधानाच्या मार्गावर चालत देशाच्या विकासाला महत्व देणाऱ्यांनी १० वर्षात कधीही संविधानाला बदलविण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे यापुढे समाज बांधवांनी अशा खोट्या व अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन गडचिरोली येथील बौद्ध समाज बांधव व आमदार डॉ. देवराव होळी यांच्या वतीने आयोजित बौद्ध मेळाव्याच्या प्रसंगी वक्ते सेवानिवृत्त बिडिओ बाळकृष्ण बांबोळे यांनी केले.
यावेळी मंचावर आमदार डॉ. देवराव होळी, प्रमोद पिपरे, भाजपा जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, अनुसूचित जाती मोर्चाचे जनार्दन साखरे, देवाजी लाटकर, माजी नगरसेविका नीता उंदीरवाडे, माजी नगरसेविका लता लाटकर, सरपंच गेडाम, पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास दशमुखे, माजी तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे, प्राध्यापक अरुण उराडे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने बौद्ध समाजातील नवीन सेवेत रुजू झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सत्कार आमदार डॉ. देवरावजी होळी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सेनी प्राध्यापक अरूण उराडे, प्रास्ताविक देवाजी लाटकर तर आभार प्रदर्शन जनार्दन साखरे यांनी केले.



