चंद्रपूरविदर्भ

अखंडित वीज सेवेसाठी पर्यायी, कायमस्वरूपी व्यवस्थेचे नियोजन करा – महावितरणचे संचालक (प्रकल्प/संचालन) सचिन तालेवार यांचे निर्देश

चंद्रपूर : वीज ग्राहकांना अखंडित सेवा देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे शोधून, आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश महावितरणचे संचालक (प्रकल्प/संचालन) सचिन तालेवार यांनी दिले. चंद्रपूर परिमंडळात २९ जून रोजी झालेल्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

तालेवार यांनी फिडरची लांबी जास्त असल्यास तिची विभागणी करणे, नवीन डीटीसी (Distribution Transformer Center) आणि एबी स्विच (Air Break Switch) लावणे, तसेच अखंडित वीजपुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करता येईल अशा कायमस्वरूपी नियोजनावर भर देण्यास सांगितले. ‘आरडीएसएस’ (Revamped Distribution Sector Scheme) योजनेअंतर्गत सुरू असलेल्या वीज यंत्रणा सुधारणा आणि मजबूतीकरणाच्या कामांना गती देण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

बैठकीत तालेवार यांनी फिडरनिहाय वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांचा आढावा घेतला. कार्यकारी अभियंत्यांना देखभाल-दुरुस्तीच्या कामांवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले. ग्राहकांची तक्रार होणार नाही यासाठी सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीने आणि वीज ग्राहकांना पूर्व सूचना देऊनच देखभाल-दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद करण्यात यावा, असे ते म्हणाले.

औद्योगिक ग्राहकांची भूमिका जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची असल्याने, त्यांच्यासाठी विजेचे महत्त्व लक्षात घेऊन सुरळीत वीज सेवा देण्यासोबतच त्यांच्या वीज सेवेविषयक अडचणी जाणून घ्याव्यात आणि त्यांच्या तक्रारी तत्परतेने सोडवाव्यात, असे निर्देश तालेवार यांनी दिले. तसेच, अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांनी प्रत्येक महिन्यातून एकदा जिल्ह्यातील उद्योजकांसोबत बैठक घेऊन वीजपुरवठ्याशी संबंधित प्रश्न सोडवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तक्रार घेऊन येणाऱ्या ग्राहकांना सौजन्याची वागणूक देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

ग्राहकांच्या नावात बदल करण्याची आणि नवीन वीज जोडणीसाठी महावितरणने ऑनलाइन व्यवस्थेची सोय केली असल्याने, वीज जोडणीचे अर्ज प्रलंबित राहणार नाहीत याची खात्री करावी, असे तालेवार यांनी सांगितले.

यावेळी बोलताना सचिन तालेवार यांनी सांगितले की, वीज ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून महावितरणमध्ये अनेक धोरणात्मक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे चंद्रपूर परिमंडळातील शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यंत महावितरणची ध्येयधोरणे, तसेच मुख्य कार्यालयातील बैठकांमधील निर्देश आणि सूचनांची माहिती देण्यासाठी नियमितपणे ‘लाइन स्टाफ’पर्यंत संवाद साधावा, असेही निर्देश त्यांनी दिले.

या बैठकीला चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता हरीश गजबे, अधीक्षक अभियंता चंद्रपूर मंडळ संध्या चिवंडे, अधीक्षक अभियंता गडचिरोली मंडळ प्रकाश खांडेकर, कार्यकारी अभियंता विकास शहाडे, विलास नवघरे, चंद्रशेखर दारवेकर, सत्यदेव पेगलपट्टी, वरिष्ठ व्यवस्थापक (विवले) राकेश बोरीवर, कार्यकारी अभियंता बल्लारशा रागीट, कार्यकारी अभियंता ब्रह्मपुरी भारतभूषण औगड, कार्यकारी अभियंता गडचिरोली पारेख, कार्यकारी अभियंता आलापल्ली वाघमारे तसेच महावितरणच्या परिमंडळातील सर्व विभागीय कार्यकारी अभियंते आणि जिल्ह्यातील उपविभागीय अभियंते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button