
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या आणि जनतेच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गंभीर समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करावी, अन्यथा ग्रामीण रुग्णालय, बीएसएनएल (BSNL) आणि महावितरण (MSEB) कार्यालयाला ‘ताला ठोको’ आंदोलन करून कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा काँग्रेस पक्षाने दिला आहे. तालुकाध्यक्ष सतीश जवाजी यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात, सिरोंचा तालुक्यातील जनतेच्या वतीने विविध ज्वलंत समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. वारंवार निवेदने देऊनही आणि चर्चा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे जनतेत प्रचंड नाराजी आणि असंतोष निर्माण झाल्याचे यात म्हटले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३सी अत्यंत खराब अवस्थेत असून, रस्ते खड्डेमय असल्याने एसटी (ST) महामंडळाच्या बसेस पूर्णपणे बंद आहेत. यामुळे शालेय विद्यार्थी, रुग्ण आणि सामान्य नागरिकांना खासगी वाहनांद्वारे जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो, ज्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून कोणताही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाही. यामुळे प्राथमिक उपचार ते शवविच्छेदनापर्यंतच्या सर्व सेवा विस्कळीत झाल्या आहेत. शवविच्छेदनासाठी डॉक्टरांना चक्क चंद्रपूरहून बोलावावे लागणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब असून, आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. बीएसएनएल नेटवर्क पूर्णपणे ढासळलेले आहे. बँक व्यवहार, सरकारी ऑनलाइन सेवा, ई-गव्हर्नन्सचे उपक्रम, आरोग्य सेवा आणि शैक्षणिक उपक्रम ठप्प होत आहेत, कारण नेटवर्क उपलब्ध नसते. यामुळे नागरिकांना तालुक्याबाहेर जावे लागते, ज्यामुळे त्यांचा आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास वाढला आहे.
शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. महाडीबीटी पोर्टलवरील अडचणी, माहितीचा अभाव आणि कार्यालयीन गलथान कारभार यामुळे शेतकरी विविध योजनांपासून वंचित राहत आहेत. कृषी विभागाचा गतीशीलपणा शून्य असून, समाधानकारक माहिती व सेवा दिल्या जात नाहीत. महावितरण विभागाकडून नियमितपणे होणारी वीज खंडितता सर्वसामान्य नागरिकांना त्रासदायक ठरली आहे. तालुक्यातील सुमारे ७०% गावांमध्ये दररोज वीजपुरवठा खंडित राहतो. यामुळे शैक्षणिक, आरोग्य, शेती आणि पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होत आहे. महावितरण कार्यालयातील कर्मचारी जनतेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात, असे जनतेचे म्हणणे आहे.
वरील सर्व समस्यांमुळे सामान्य जनतेत अस्वस्थता निर्माण झाली असून, प्रशासनावरील विश्वास डळमळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेस पक्षाने प्रशासनाला पुढील १५ दिवसांच्या आत एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याची विनंती केली आहे. या समितीने सर्व संबंधित विभागांचे कार्यस्थळी निरीक्षण करून उपाययोजना ठरवाव्यात आणि त्यांची अंमलबजावणी निश्चित कालमर्यादेत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा, जनतेचा असंतोष लक्षात घेता, काँग्रेस पक्ष आणि नागरिकांच्या वतीने बीएसएनएल कार्यालय, महावितरण कार्यालय आणि ग्रामीण रुग्णालयाला कुलूप ठोकण्यात येईल. याची पुढील पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
हा निर्णय समाजहित आणि जनतेच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी घेतलेला असून, प्रशासनाने वेळेत योग्य निर्णय घेऊन तातडीने कृती आरंभ केल्यास आंदोलनाची गरज भासणार नाही, असेही सतीश जवाजी (तालुकाध्यक्ष, काँग्रेस पक्ष सिरोंचा) यांनी नमूद केले आहे.



