अतिदुर्गम, अतिसंवेदनशील भागात सोई-सुविधा पोहचवणे हे प्रथम ध्येय – डॉ. शिलू चिमुरकर
कोरची तालुक्यात जनसंवाद यात्रा

कोरची (ता.प्र.) : आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या बहुतांश भागातील नागरिक हे अतिदुर्गम, अतिसंवेदनशील भागात वास्तव्यास आहेत. मात्र वीज, पाणी, रस्ते, आरोग्याच्या सुविधा अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहचत नसल्याने त्या पोहचवणे हे प्रथम ध्येय आहे, असे प्रतिपादन डॉ. शिलू चिमुरकर यांनी केले.
जनसंवाद यात्रेनिमित्त कोरची येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत वैष्णवी आकरे वडसा, गिताबाई नाकाडे विसोरा, देवका शेंडे विसोरा, लिलाधर भर्रे कुरूड, पींकु बावणे, आसाराम बाळबुद्धे, देवाभाऊ शहारे कोरेगाव, बागेश्वर आळे, कृष्णा उईके, सदाशिव चिंचेकर, गोपाल शेंदरे, नंदलाल गोंडाणे, मोतीराम कांबळे, महादेव कुमरे बोळदा, सर्वेश्वर मेश्राम ईत्यादी कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डॉ. शिलू चिमुरकर यांनी कोरची तालुक्यात जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. कोरची तालुक्यात विविध गावात ही संवाद यात्रा आठ दिवस चालणार आहे.
डॉ. शिलू चिमुरकर पुढे म्हणाल्या की, रस्ते विकासात प्रचंड भ्रष्टाचार करण्यात आल्याने अद्यापही दुर्गम भागातील गावे पक्के रस्त्याशी जोडण्यात आले नाहीत. ज्या गावांचा पावसाळ्यात मुख्य मार्गाशी संपर्क तुटतो अशा गावांना बारमाही रस्त्याशी जोडण्याला प्रथम प्राधान्य असेल.
प्रत्येक गावात आरोग्याच्या सुविधा पोहोचाव्यात, प्रत्येक नागरीकांचे जीवनमान उंचवणे हे एकमेव ध्येय आहे. दुर्गम भागात मलेरीयाच्या प्रकोपाने दरवर्षी अनेकांचा बळी जात आहे. ते थांबवण्याला प्रथम प्राधान्य देऊन दुर्गम भागातील नागरीकांना आपल्या न्याय हक्कासाठी जागृत करणे हे ध्येय आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहु नये तसेच शिक्षणापासून वंचित राहु नये याकरीता प्राधान्याने समस्या सोडविण्याचा प्रयत्न असेल. आरमोरी विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जंगल असुन वनसंपदेने नटलेला परिसर आहे. तसेच मौल्यवान खनिज, वनसंपदा आहे. जल, जंगल, जमिनीचे खरे संरक्षण आदिवासी असल्याने त्यांच्या मौलिक अधिकाराचे संरक्षण काँग्रेसच करू शकते, त्यामुळे काँग्रेसचे विचार घरा घरापर्यंत पोहचवणे हे ध्येय आहे.
आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर यांची फसवणूक होणार नाही, त्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळवून देणे, आधुनिक शेतीकडे वळवणे तसेच सिंचन सुविधेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याला प्राधान्य असेल. दुर्गम भागात अद्यापही दूरसंचार विभागाचे आवश्यक त्या प्रमाणात जाळे पसरविण्यात आले नाही. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान व माहिती दुर्गम भागात पोहचत नाही, ती पोहचवण्याला प्राधान्य असेल. शासकीय स्तरावरुन देण्यात येत असलेल्या कोणत्याही लाभाच्या योजना गरजुंपर्यंत पोहचतात की नाही याबाबत आढावा घेऊन गरजुंपर्यंत पोहचवण्याला प्राधान्य असेल. पेसा क्षेत्रातील ग्रामसभांना विश्वासात घेतल्याशिवाय त्यांच्या हक्काचे हनन होणार नाही, याकरीता स्थानिक गावपातळीवर समन्वय समीत्या स्थापन करून ग्रामसभेच्या संमतीशिवाय कोणतेही बेकायदेशीर काम होऊ देणार नसण्याला प्राधान्य असेल. ज्या गावात अद्यापही वीज पोहचली नाही त्या गावांना आवश्यक प्रमाणात वीज पुरवठा करणे याला प्राधान्य असेल. विद्यार्थी तो कुठल्याही समाजाचा असो त्याला आवश्यक शैक्षणिक सुविधा मिळवून देण्यासह प्रत्येक गावात वाचणालय सुरु करून उच्च शिक्षणासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्याला प्राधान्य असेल, असे डॉ. शिलू चिमुरकर यावेळी म्हणाल्या.



