राष्ट्रपतींच्या हस्ते शिक्षक मांतय्या बेडके यांचा सन्मान

गडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम एटापल्ली तालुक्यातील जाजावंडी येथे कार्यरत असलेले शिक्षक मांतय्या बेडके यांना अतिदुर्गम व संवेदनशील भागात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल व त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला होता. नुकताच दिल्ली येथे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने शिक्षक बेडके यांचा सन्मान करण्यात आला.
जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील जाजावंडी येथील शिक्षक मांतय्या बेडके हे जाजावंडी येथे राहून गेल्या १४ वर्षांपासून विद्यार्थ्यांची सेवा करीत आहेत. यावेळी त्यांची नियुक्ती जाजावंडी येथील १ ते ७ वर्ग असलेल्या जि.प. शाळेत झाली. त्यावेळी त्या शाळेत केवळ आठ विद्यार्थी होते. मात्र, त्यांनी परिसरातील दहा गावांतून फिरून विद्यार्थी जमा केल्याने आज शाळेची पटसंख्या १३८ पर्यंत आहे. शाळेच्या माध्यमातून विद्याथ्यांसाठी विविध उपक्रम राबविले असून त्यामुळे या दुर्गम व नक्षलग्रस्त भागात शिक्षणाची गंगा वाहू लागली.
या भागातील अनेक विद्यार्थी क्रीडा व कला क्षेत्रात नाविण्यप्राप्त केले असून शाळेतील काही विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये नावलौकीक मिळविला आहे. याचे श्रेय म्हणून केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास विभागाने शिक्षक मांतय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर केले होते. शिक्षक बेडके यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.



