गोंदियामुख्य बातमीविदर्भ

अवघ्या दोन महिन्यातच राष्ट्रीय महामार्गावरील पुलाला पडल्या भेगा

मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील प्रकार ; पूल दुभंगल्याने एकेरी वाहतूक सुरु 

गोंदिया : दोन महिन्यापूर्वीच वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेल्या मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाला मोठमोठ्या भेगा पडल्याचा प्रकार गुरुवारी (दि.५) उघडकीस आला, तर हा पूलच दुभंगल्याचे चित्र आहे. परिणामी पुलावरून आता एकेरी वाहतूक करण्याची नामुष्की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर आली आहे. पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर चार वर्षांपूर्वी नागपूर ते देवरी दरम्यान मौदा, मोहघाटा, नैनपूर, मासूलकसा घाट व शिरपूर या पाच ठिकाणी जंगल परिसरात वन्यप्राण्यांच्या आवागमनासाठी भुयारी मार्गाला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील कोहमारा ते देवरीपर्यंत नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा जंगल परिसर असल्याने नैनपूर व मासूलकसा घाट परिसरात वन्यप्राण्यांना आवागमन करण्याकरिता सोईस्कर व्हावे यासाठी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यात नैनपूरजवळील एक पूल वाहतुकीसाठी दोन महिन्यापूर्वी सुरू करण्यात आला होता.

मात्र, दोन महिन्यांतच या उड्डाणपुलावर मोठमोठ्या भेगा पडल्याने पूल बंद करण्याची वेळ संबंधित कंपनी व महामार्ग प्राधिकरण प्रशासनावर आली आहे. तर यापूर्वी याच मार्गावरील मासूलकसा येथील निर्माणाधीन उड्डाणपुलाचा एक भाग खचला होता. त्यामुळे पूल आणि रस्त्याच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरुवातीला पुलावरून वाहतूक सुरू होताच आठवडाभरात या पुलावर मोठे भगदाड पडले होते. त्यावेळीही या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती. दुरुस्ती केल्यानंतर दोन महिन्यापूर्वी या पुलावरून पुन्हा वाहतूक सुरु करण्यात आली. मात्र, यावेळी पुलावर मोठमोठ्या भेगा पडल्याने हा उड्डाणपूल दुभंगल्याचे चित्र आहे. परिणामी या पुलावरून एकेरी मार्गाने वाहतूक करण्याची वेळ महामार्ग प्राधिकरणावर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button