गडचिरोलीविदर्भ

गडचिरोलीच्या मुलींचा बॉल बॅडमिंटनमध्ये डंका, राज्यात पटकावले तिसरे स्थान

गडचिरोली : अहिल्यानगर येथील महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठात १६ ते १९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या ४४ व्या सबज्युनियर बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत गडचिरोली जिल्हा मुलींच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यातून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

या स्पर्धेत गडचिरोली संघाने बुलढाणा, अहिल्यानगर, अकोला आणि मुंबई यांसारख्या बलाढ्य संघांचा पराभव करून उपउपांत्य फेरी गाठली. त्यानंतर, अमरावती संघाचा सरळ सेटमध्ये पराभव करत त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य सामन्यात पुणे संघाकडून त्यांना कडवी झुंज दिल्यानंतर पराभव पत्करावा लागला. मात्र, तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात नाशिक संघावर मात करून त्यांनी राज्यात तृतीय स्थान मिळवले.

या विजयी संघात सुप्रिया जुवारे (संघनायक), माधवी कळते, निधी जांभुळकर, राधिका मगरे, मोहिनी पिंपरखेडे, धानी बिसेन, कृतिका वासेकर, आलिया आंबटकर, लावण्या प्रेमलवार, आणि श्रेया होळी या खेळाडूंचा समावेश होता. या सर्व खेळाडू शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, गडचिरोलीच्या विद्यार्थिनी आहेत.

गडचिरोलीच्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावरही आपला ठसा उमटवला आहे. या स्पर्धेतून निधी जांभुळकर आणि राधिका मगरे यांची तामिळनाडू राज्यातील दिंडीगुल येथे २४ ते २९ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या सबज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. तसेच, मोहिनी पिंपरखेडे ही राखीव खेळाडू म्हणून निवडली गेली आहे. या व्यतिरिक्त, सुप्रिया जवारे हिची आधीच सीनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

या विजयाबद्दल गडचिरोली बॉल बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश संग्रामे, सचिव व मुख्य प्रशिक्षक प्रा. ऋषिकांत पापडकर, प्रा. रूपाली पापडकर, तसेच शिवाजी हायस्कूलचे शारीरिक शिक्षक आणि इतर प्रशिक्षकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशाने गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button