गोंदियाविदर्भ

गोंदियात “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” मोहिमेचा शुभारंभ

पहिल्याच दिवशी ९५३ महिलांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

गोंदिया : महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे. या उद्देशाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सुरू झालेल्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या विशेष अभियानाचा गोंदिया येथे भव्य शुभारंभ झाला. पहिल्याच दिवशी या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला असून, एकूण ९५३ महिलांनी विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला.

जिल्हा सामान्य रुग्णालयात (के.टी.एस. रुग्णालय) गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन झाले. आमदार अग्रवाल यांनी ‘स्वस्थ नारी म्हणजे सशक्त कुटुंब आणि सक्षम समाज’ असे सांगत, महिलांना या उपक्रमात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले. हे अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबवले जाणार आहे. या दरम्यान, सर्व आरोग्य संस्थांमध्ये मोफत आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. यामध्ये सर्व वयोगटातील महिला, गर्भवती महिला, किशोरवयीन मुली आणि बालकांची तपासणी, औषधोपचार आणि आवश्यक असल्यास शस्त्रक्रियाही मोफत केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी दिली.

अभियानाच्या पहिल्या दिवशी के.टी.एस. रुग्णालयात आयोजित शिबिरात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९५३ लाभार्थ्यांपैकी १०१ महिलांची नेत्र तपासणी, १०७ महिलांची दंत तपासणी, तर १३८ महिलांची कर्करोग तपासणी करण्यात आली. याशिवाय, ४९ गर्भवती महिलांना कार्ड देण्यात आले, १८८ महिलांना पोषण आहाराविषयी समुपदेशन मिळाले आणि ५८१ महिलांच्या विविध प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या. याव्यतिरिक्त, १४५ महिलांनी टेलिकन्सल्टेशन सेवेचा लाभ घेतला, २३२ जणांनी अवयवदानाची शपथ घेतली आणि १६ लोकांनी रक्तदान केले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत, या उपक्रमामुळे महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास व्यक्त केला. या मोहिमेत गर्भवती माता, किशोरवयीन मुली आणि प्रौढ महिलांना आरोग्य तपासणी, समुपदेशन आणि उपचार सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जातील.

कार्यक्रमावेळी सीता रहांगडाले, रोहित अग्रवाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, नागपूर विभागाचे नोडल अधिकारी डॉ. शाम निमगडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कांचन भोयर आणि संध्या शंभरकर यांनी केले. यावेळी उपस्थितांनी अवयवदान आणि क्षयरोग (TB) निक्षयमित्राची शपथ घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button