गोंदियामुख्य बातमीविदर्भ

समाजातील शेवटचा घटक हा न्यायापासून वंचित राहु नये – न्यायमूर्ती नितीन एम. जामदार

गोंदियात विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा

गोंदिया : न्याय म्हणजे काय किंवा अन्याय झाला तर कुठे जायचे एवढी जरी माहिती मिळाली तरी न्यायाच्या दिशेने वाटचाल सुरू होते. आपल्या देशामध्ये संविधान आल्यानंतर समजातील ब-याच घटकांना आपले हक्क काय आहेत याची माहिती नव्हती, त्यामुळे संविधानामध्ये सुधार करून आर्टिकल ३९-अ आणला गेला. यामध्ये मोफत आणि सक्षम न्याय मिळविण्याचा अधिकार सर्वांना प्राप्त झाला. ज्यामुळे आजच्या महाशिबिर हा न्यायाची वाटचाल करण्याचा अत्यंत महत्वाचा एक पाउल आहे. समाजातील पिडीत व्यक्तींसाठी सरकार विविध योजना राबवितो परंतु जोपर्यंत त्यांना माहित नसणार तोपर्यंत त्या सर्व योजना कागदावरच असतात. त्यामुळे अशाप्रकारच्या जनजागृती शिबीरामार्फत प्राथमिक माहिती पुरविण्याचा प्रयत्न केला जातो असे मत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन एम. जामदार यांनी व्यक्त केले.

१४ सप्टेंबर रोजी पवार सांस्कृतिक भवन, गोंदिया येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा तसेच कायदेशीर मदत संरक्षण सल्लागार प्रणाली कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकारण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोदिया, जिल्हा न्यायालय, गोंदिया व जिल्हा प्रशासन, गोंदिया यांचे संयुक्त विद्यमाने १४ सप्टेंबर रोजी पवार सांस्कृतिक भवन, गोंदिया येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजन करण्यात आला. सदर मेळाव्याचे उ‌द्घाटन न्यायमूर्ती नितीन एम. जामदार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी न्यायमूर्ती नितीन डब्ल्यू. सांबरे, व न्यायमूर्ती महेंद्र डब्ल्यू. चांदवाणी हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमापूर्वी मान्यवरांनी कायदेशीर मदत संरक्षण सल्लागार प्रणाली कार्यालयाचे गोंदिया न्यायालय परिसरामध्ये उ‌द्घाटन केले.

मेळाव्यास महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव समीर एस. अडकर, जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलिस अधिक्षक गोरख भामरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मुरूगानंथम एम., विभागीय वनाधिकारी (सामाजिक वनीकरण) तुषार ढमढेरे, इतर शासकीय विभागांचे अधिकारी आणि गोंदिया जिल्हातील सर्व न्यायीक अधिकारी उपस्थित होते.

मान्यवरांचे स्वागत जाम्यातिम्या विद्यालय गोरेगाव येथील शालेय विद्यार्थ्यांनी स्वागतगीताने केली. त्यानंतर मान्यवरांनी विविध शासकीय विभागांच्या स्टॉलचे उद्घाटन केले. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे गीत लावण्यात आले. कार्यक्रमाचा शुभारंभ विचारपिठावरील उपस्थित मान्यवरांनी रोपट्यांना जल देवून केला. कार्यक्रमामध्ये शालेय विदयार्थ्यांनी स्वागत गीत गायले व सांस्कृतिक नृत्य केले. न्यायमूर्तींच्या व इतर मान्यवरांचा सत्कार न्यायीक अधिकारी व वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. प्रास्ताविक भाषणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद टि. वानखेडे यांनी विधी सेवा व शासकीय महाशिबीर आयोजनामागील उद्देश उपस्थितांना सांगितला व विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. तसेच त्यांनी ‘न्याय सर्वांसाठी’ हे विधी सेवा प्राधिकरणाचे घोषवाक्य आहे असे सांगीतले. राष्ट्रीय स्तरापासुन ते तालुका स्तरापर्यंत विधी सेवा प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली आहे असे सांगीतले. समाजातील कोणतीही व्यक्ती किंवा घटक न्यायापासुन वंचित राहु नये हा भारतीय संविधानाचा मुळ उद्येश आहे, असे सांगीतले.

जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी त्यांच्या भाषणामध्ये नागरीकांनी महामेळाव्यातील विविध शासकिय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. न्यायमूर्ती महेंद्र डब्ल्यू. चांदवाणी यांनी सर्व उपस्थितांना सामाजिक न्याय योजना, कृक्षी योजना, बचत गट योजना इत्यादी शासकिय योजनांचा लाभ घेवून स्वतःचा विकास करून घ्यावा, जिवनमान सुधारावे व मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन केले.

न्यायमूर्ती नितीन डब्ल्यू, सांबरे यांनी शासनाच्या विविध योजनांबाबत नागरीकांना माहिती दिली. तसेच त्यांनी दिव्यांग जोडप्यांना प्रत्येकी ५०,०००/- रूपयाचे धनादेशाद्वारे अर्थसहाय्य देउन सत्कार केला. तसेच त्यांनी गोंदिया जिल्यामध्ये आढळणा-या सारस पक्षांचे संरक्षण करण्यासंबंधी शेतक-यांना मार्गदर्शन केले.

त्याचप्रमाणे न्यायमुर्ती नितीन एम. जामदार यांचेहस्ते दोन दिव्यांग लाभार्थ्यांना गॅझेटचे वाटप आणि तीन दिव्यांग लाभार्थ्यांना यु.डि.आय.डी. (UDID) कार्ड तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि शालेय अंध विद्यार्थ्यांना Dozy Mobile चे वितरण केले. मान्यवरांनी सर्व स्टॉलची पाहणी केली. सदर कार्यक्रमाचा मुख्य हेतू कायद्याबाबतची माहिती नागरिकांना व्हावी आणि शासनाच्या विविध योजनांचा प्रचार/प्रसार व्हावा, असा होता. कार्यक्रमासाठी जिल्हयाच्या विविध भागातून बहुसंख्येने नागरीक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये सर्व तालुक्यातील वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य हजर होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राजक्ता ढाणे व तेजश्री गवई यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन एन. के. वाळके यांनी केले.

कार्यक्रमामध्ये जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष टि. वी. कटरे, सचिव आर.ओ. कटरे, उपाध्यक्ष मेघा राहांगडाले तसेच सर्व तालुका वकिल संघाचे अध्यक्ष, तसेच वरीष्ठ वकिल ओ. जी. मेठी, पी. सी. चव्हाण आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जिल्हा न्यायाधीश-१ ए. एस. प्रतिनिधी, जिल्हा न्यायाधीश-२ एम. टी. आसिम, जिल्हा न्यायाधीश-३ एन. डी. खोसे, सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस. आर. मोकाशी, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) वाय. जे. तांबोळी, प्रबंधक पी. पी. पांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदियाचे कर्मचारी व इतर सर्व न्यायीक कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button