३ लाखांचा प्रतिबंधित तंबाखू जप्त ; दोघांवर गुन्हा दाखल
नाकाबंदीत साकोली पोलिसांची कारवाई

साकोली : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या व मानवी जीवितास हानिकारक असलेला तंबाखू व तंबाखूजन्य गुटखा, पानमसाला भंडारा जिल्ह्यात येत असताना साकोली पोलिसांनी कारवाई करून तीन लाख रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला. ही कारवाई १५ सप्टेंबरच्या रात्री करण्यात आली. या कारवाईमध्ये एकूण आठ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून, दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सानगडी येथे करण्यात आली.
उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज फ्रीडम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर सानगडी येथील नवेगावबांध फाट्यावर नाकाबंदी करून कारमधून सुगंधित तंबाखूची तस्करी करीत असलेल्या दोन तस्करांना उपविभागीय पोलिस विभागाच्या चमूने पकडले. एमएच १५/ बीएल ५६८९ क्रमांकाच्या कारमधून सुगंधित तंबाखू नवेगावबांधकडून सानगडीकडे येत असल्याची माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम व कार्यालयीन चमूने फाट्यावर सापळा रचला होता. संबंधित क्रमांकाचे वाहन येताच थांबवून तपासणी केली असता डिक्कीमध्ये सुगंधित तंबाखूचा ३० बोरी माल मिळाला. चालक मुनेश्वर ताराम (३२) व मालक देवेश पटेल (४०, दोघेही नवेगाव बांध) यांच्याविरुद्ध साकोली पोलिसांत गुन्हा नोंदवून फोनला कंपनीचे २०० ग्रॅम वजनाचे ५५० पाकीट (किमत ९०,२०० रुपये) मजा कंपनीचे ५० ग्रॅम वजनाचे १०८ पाऊच (किंमत २३,५०० रुपये), ईगल ४०० ग्रॅम वजनाचे ३१९ पॉकेट (किमत २,०४,१६० रुपये) असा एकूण ३० बोरी सुगंधित तंबाखू सापडला. याची किमत ३,३०,३४० रुपये आणि वाहनासह ८,३०३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम, उपनिरीक्षक चौधरी, हवालदार प्रशांत गुरव, राजेंद्र कुरूडकर, सचिन टिचकुले, नायक स्वप्निल गोस्वामी, महेश कुळमथे, शिपाई लोकेश कोटवार यांनी केली. गाडीचा चालक मुनेश्वर ताराम याला अटक करण्यात आली असून देवेस पटेल याची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला भंडारा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.



