भंडाराविदर्भ

सहाय्यक संचालक डॉ. हजारे यांची पीएचसी शहापूरला भेट

कार्यपद्धती आणि आरोग्य सेवांचा घेतला आढावा

भंडारा : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ. सरिता हजारे यांनी ७ ऑक्टोबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, शहापूर, आणि आरोग्य वर्धिनी उपकेंद्र, खरबी येथे भेट देऊन तेथील कार्यपद्धती आणि आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. कर्मचाऱ्यांच्या कामावर समाधान व्यक्त करत त्यांनी ग्रामीण भागात ही सेवा खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचत असल्याचे कौतुक केले.

डॉ. हजारे यांनी आरोग्य केंद्रातील विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि सेवा योग्य पद्धतीने राबवल्या जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी बाह्य रुग्ण विभाग (OPD), औषध वितरण व्यवस्था, लॅब तपासण्या, मातृ-आरोग्य व बालआरोग्य सेवा, लसीकरणाची नोंद आणि विविध नोंदवहींची बारकाईने तपासणी केली. त्यांनी विशेषतः गर्भवती महिलांचे वजन, हिमोग्लोबिन तपासणी, पोषणाविषयी माहिती आणि आगामी “गोवर-रुबेला” विशेष लसीकरण मोहिमेच्या तयारीबद्दल विचारणा केली. केंद्राच्या स्वच्छता व्यवस्थापन, औषध साठा आणि कर्मचारी उपस्थितीची तपासणी करण्यात आली. रोगप्रतिबंधक उपाययोजना आणि गावपातळीवरील आशा कार्यकर्त्यांच्या योगदानावरही यावेळी चर्चा झाली.

डॉ. सरिता हजारे यांनी यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “ग्रामीण भागात ही सेवा अत्यंत महत्त्वाची असून, आरोग्य कर्मचारी मेहनतीने आपले कार्य करत आहेत. या माध्यमातून सरकारची सेवा खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचत आहे.”

या भेटीदरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन चव्हाण, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. श्रीकांत आंबेकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी अनिल बनकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. झोडे आणि डॉ. फंदे यांच्यासह आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button