
खापा चौकात पोलिसांची कारवाई
तुमसर : मध्य प्रदेशातील दोन युवक दुचाकीवरून जाताना तुमसर पोलिसांनी त्यांची झडती घेतली. त्यांच्याकडे एका प्लास्टिकच्या पिशवीत सहा किलोपेक्षा अधिक गांजा हा अमली पदार्थ मिळून आला. या गांजाची किंमत सुमारे १ लाख ३१ हजार ८०० रुपये इतकी आहे. तुमसर येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे व पोलिस निरीक्षक संजय गायकवाड त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
भुरा निरपतसिंह धाकड (४५, रा. उडिया रायसेन (मध्य प्रदेश), यशवंत हरी गोविंदसिंह धाकड (२५, रा. घाना बहिडिया, तहसील उदयपुरा (मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या युवकांची नावे आहेत. मंगळवारी पहाटेच्या सुमारास दोन युवक दुचाकीवरून (क्र. एमएच ०५ डीजे ७११४) खापा चौकातून जात होते. संशयास्पद हालचालींवरून त्यांना गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी थांबविले. दुचाकीची झडती घेतली असता त्यात एका प्लास्टिकच्या पिशवीत सहा किलोपेक्षा अधिक गांजा आढळला. यात हिरवट काळपट रंगाची पाने, फुले, देठ, कळ्या, बिया असलेले गांजा होता. गांजा हा अमली पदार्थ असून, मध्य प्रदेशातून मागील काही महिन्यांपासून तुमसर शहरात गांजा मोठ्या प्रमाणात येत आहे. कारवाई करण्यात आलेला गांजा तुमसरमार्गे नागपूर येथे जात होता. दोन्ही आरोपींवर कलम ८ (क) २० (ब), २९ एमपीडीएस अॅक्ट १९८५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.



