गडचिरोलीविदर्भ

पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या यशस्वी वाटचालीनिमित्त गडचिरोलीत ‘संकल्प ते सिद्धी’ कार्यशाळा

“सेवा, सुशासन, गरीब कल्याण” या त्रिसूत्रीने भारताला नव्या उंचीवर नेले – माजी खा. डॉ. अशोक नेते

गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या यशस्वी वाटचालीनिमित्त भारतीय जनता पार्टी, जिल्हा गडचिरोलीतर्फे “संकल्प ते सिद्धी” या विशेष जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन सोमवारी गडचिरोली येथील पत्रकार भवनामध्ये करण्यात आले. कार्यशाळेची सुरुवात जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त दीपप्रज्वलन व अभिवादनाने करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते होते. त्यांच्यासोबत प्रमुख उपस्थितीत भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, कि.मो.प्र.सचिव नेते रमेश भुरसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, समन्वयक प्रमोद पिपरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गिता हिंगे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, तालुकाध्यक्ष दत्तू सुत्रपवार, काम.आ.प्र. सचिव गोवर्धन चव्हाण, ज्येष्ठ नेते सुधाकर येनगंदलवार, विलास भांडेकर, मुक्तेश्वर काटवे, अनिल करपे, विनोद देवोजवार तसेच या कार्यशाळेला जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, मंडळ संयोजक, तालुकास्तरावरील कार्यकर्ते, महिला व युवा मोर्च्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या कार्यशाळेत बोलताना माजी खा. डॉ. नेते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेवा, सुशासन व गरीब कल्याण या त्रिसूत्रीच्या माध्यमातून भारताला नव्या उंचीवर नेले आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या मूलमंत्रातून संपूर्ण देशात नवचैतन्य निर्माण झाले आहे. योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे कार्य या सरकारने केले.” असे डॉ. अशोक नेते यांनी आवर्जून सांगितले.

डॉ. अशोक नेते पुढे बोलताना म्हणाले, “काँग्रेसने ६०-६५ वर्षं देशावर राज्य केले, मात्र जे काम तेवढ्या काळात होऊ शकले नाही, ते केवळ ११ वर्षांत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झाले. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवणे, तीन तलाकचा कायदा, सर्जिकल स्ट्राईक, ‘ऑपरेशन सिंदूर’, राम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय, आणि कोरोनासारख्या महाभयानक संकटात देशाला सुरक्षित ठेवण्याचे काम — हे सर्व यश मोदींनी आपल्या मजबूत इच्छाशक्तीने साध्य केले आहे.”

तसेच, भारताची अर्थव्यवस्था जी पूर्वी बळकट नव्हती, ती आज जागतिक स्तरावर अग्रगण्य बनली आहे. देशाची प्रतिमा बळकट करण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केले आहे. याचे श्रेयही मोदी सरकारच्या धोरणांना दिले गेले. या कार्यशाळेद्वारे केंद्र सरकारच्या विविध योजना, कार्यपद्धती तसेच आगामी काळात राबवायच्या जनजागृती उपक्रमांबाबत मार्गदर्शन मिळाल्याने भाजपाच्या संघटनात्मक बळकटीस निश्चितच फायदा होणार आहे, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी या कार्यशाळेत केले.

“संकल्प ते सिद्धी” ही कार्यशाळा केवळ एक आयोजन नव्हे, तर पुढील कार्यप्रवृत्तींसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास मंचावर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button