गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

कोरचीचे शिकारीटोला गाव बनले ‘दारूमुक्त’ आदर्श: आठ वर्षांपासून अवैध दारूविक्री बंद

महिलांच्या पुढाकारातून आणि मुक्तिपथच्या सहकार्याने गावकऱ्यांची क्रांती; दारूविक्रीचा प्रयत्न हाणून पाडला

गडचिरोली : कोरची तालुका मुख्यालयापासून २२ किमी अंतरावर असलेल्या शिकारीटोला या छोट्याशा गावाने २०१७ पासून अवैध दारूविक्री बंद ठेवून इतर गावांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. ही दारूबंदी कायम टिकून राहावी, यासाठी मुक्तिपथतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची ग्रामस्थांच्या माध्यमातून योग्य अंमलबजावणी केली जाते.

कोटरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शिकारीटोला या गावात ३५ ते ४० घरांची वस्ती आहे. या गावात आदिवासी समाज वास्तव्य करतो आणि आपल्या परंपरा व रीतीरिवाजानुसार धार्मिक व सामाजिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे करतो. या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून, हंगामी तेंदूपत्ता, मोहफूल अशा वनोपजातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

आठ वर्षांपूर्वी या गावात दारू मिळायची. कार्यक्रम असो किंवा सणासुदीच्या काळात काही विक्रेते दारू काढायचे, ज्यामुळे व्यसनाचे प्रमाण वाढत होते आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये गोंधळ व्हायचा. यामुळे आपल्या गावातून अवैध दारू हद्दपार करणे काळाची गरज आहे, हे गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या लक्षात आले. अशातच पेसा ग्रामसभेत दारूबंदीचा मुद्दा उपस्थित करून सर्वानुमते दारूबंदीचा ठराव ग्रामस्थांनी पारित केला.

या ठरावाची अंमलबजावणी व्हावी, याकरिता मुक्तिपथच्या सहकार्याने दारूबंदी गाव संघटना गठीत करण्यात आली. दारूविरोधात जागृती, लोकांना जोडून संघटना मजबूत करणे, दारूविक्रेत्यांविरोधात अहिंसक कृती आणि दारूचे व्यसन असलेल्या रुग्णांसाठी गाव पातळीवर व्यसन उपचार शिबीर अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविण्यात आले. अखेर ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नातून हे गाव पूर्णपणे दारूमुक्त झाले. आता २०१७ पासून सलग आठ वर्षे शिकारीटोला हे गाव अवैध दारूविक्रीमुक्त गाव म्हणून ओळखले जाते.

गाव विकासासाठी आवश्यक असलेली आणि ग्रामस्थांनी मोठे परिश्रम घेऊन लागू केलेली दारूबंदी कायम टिकून राहावी, यासाठी मुक्तिपथ तालुका संघटिका निळा किन्नाके यांनी संबंधित गावातील लोकांशी भेटीगाठी वाढविल्या. गाव संघटना व शक्तिपथ संघटनेच्या महिलांची बैठक घेऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले. दारूविरोधात गाव संघटना सक्रिय असल्याने नवीन किंवा जुन्या विक्रेत्यांनी दारू काढण्याचा पुन्हा प्रयत्नदेखील केला नाही. या छोट्याशा गावात दारूबंदी कायम राहावी, यासाठी पोलीस पाटील प्रमोद कोवाची, गाव संघटनेचे धर्मसाय कोवाची, तुळशीदास बावनकर, लुईराम कोवाची, मोतीराम मलगाम, रामसाय गोटा, राजाराम कोवाची, राजू कोवाची, निद्राबाई कोवाची, सामसाय कोवाची, राजू कोवाची, देवनाथ नरेटी, गोपिका बावनकर, भूषण डोकरमारे यांच्यासह गाव संघटनेचे पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत.

दारूविक्रीचा प्रयत्न हाणून पाडला

कोटरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तैमूल, हेटाळकसा, हितापाडी व कोटरा ही चार गावे वगळता एकट्या शिकारीटोला या गावात सलग ८ वर्षांपासून अवैध दारूविक्री बंद आहे. काही दिवसांपूर्वी लहान-मोठे किराणा दुकान असलेल्या एका व्यवसायिकाने पहिल्यांदा विक्रीसाठी दारू आणल्याची माहिती कळताच, सभेमध्ये संबंधित विक्रेत्याला बोलावून समज देण्यात आली. याला सकारात्मक प्रतिसाद देत विक्रेत्याने स्वतःकडील दारू गाव संघटनेच्या स्वाधीन केली आणि यापुढे आपण कधीच दारूविक्री करणार नाही अशी हमी दिली. जप्त केलेली ५२ देशी दारूचे नग नंतर नष्ट करण्यात आले. ही घटना शिकारीटोला गावातील दारूबंदीच्या कठोर अंमलबजावणीचे उत्तम उदाहरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button