
गोंडवाना विद्यापीठात ‘राष्ट्रीय उच्च शिक्षण पात्रता रूपरेषा‘ (NHEQF) वर शिक्षक विकास कार्यक्रम
गडचिरोली : शिक्षणात भारतीय ज्ञान परंपरा आणि नैतिकता यांचा समावेश नसेल, तर शिक्षणाचे मूळ उद्दिष्टच हरवून जाईल. शिक्षण केवळ नोकरीपुरते मर्यादित न राहता ते चारित्र्य, सामाजिक भान आणि वैश्विक दृष्टिकोन देणारे असावे, असे प्रतिपादन सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी केले आहे.
गोंडवाना विद्यापीठात ‘राष्ट्रीय उच्च शिक्षण पात्रता रूपरेषा’ (NHEQF) या विषयावर आयोजित एक दिवसीय शिक्षक विकास कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते. प्रमुख वक्ते म्हणून सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी, नवी दिल्लीचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी आणि कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी होते. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी विद्यापीठाला ‘पीएम उषा’ योजनेंतर्गत मिळालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीचा कसा वापर केला जाईल, याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “या निधीचा उपयोग केवळ भौतिक सुविधा वाढवण्यासाठीच नाही, तर आदिवासी ज्ञान प्रणाली आणि येथील वनांमध्ये उपलब्ध असलेल्या वनौषधींचा उपयोग अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जाईल. यासाठी विद्यापीठाने ‘वैदू चिकित्सालय’ सुरू केले असून, त्याचा फायदा स्थानिक नागरिकांना होत आहे.”
कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांनी शिक्षणातून कौशल्य विकासाला चालना देण्यावर भर दिला. ते म्हणाले, “उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल शिक्षण आणि इंटर्नशिपद्वारे प्रत्यक्ष अनुभव देणे आवश्यक आहे. यामुळे त्यांची रोजगारक्षमता वाढून ते आत्मनिर्भर बनतील. २०२४७ पर्यंत भारत केवळ आर्थिक नव्हे, तर शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक अशा सर्व रूपांत एक विकसित राष्ट्र बनेल आणि त्याचे अनुकरण जग करेल.”



