गोंदियाविदर्भ

विकासाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी प्रजित नायर यांचे निर्देश

गोंदिया : जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली एक नियोजनात्मक बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी सर्व संबंधित विभागांना विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या बैठकीत आगामी आर्थिक वर्षातील विविध विकास योजना, निधीचे योग्य नियोजन आणि वितरण, तसेच प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यावर सविस्तर चर्चा झाली.

जिल्हाधिकारी नायर यांनी सांगितले की, पायाभूत सुविधांच्या कामांसाठी प्रशासकीय मान्यता देण्यापूर्वी ऑनलाइन युनिक आयडी क्रमांक मिळवणे बंधनकारक असेल. त्यांनी सर्व विभागांना परस्परांशी समन्वय साधून काम करण्याचे आवाहन केले, जेणेकरून विकासकामांना गती मिळेल आणि प्रलंबित प्रस्ताव लवकर मार्गी लागतील. निधीचा योग्य आणि नियोजित वापर करणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील धोंगडे, सहाय्यक ‍जिल्हा नियोजन अधिकारी रूपेश राऊत, जि.प. लघु पाटबंधारे कार्यकारी अभियंता सत्यजीत राऊत यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध विभागप्रमुखांनी त्यांच्या योजनांमधील अडचणी आणि प्राधान्यक्रम मांडले, ज्यावर चर्चा करून उपाययोजना सुचवण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button