क्राईमगडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

ट्रक व अवैध दारूसह २५ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त

दोन आरोपी ताब्यात ; रेपनपल्ली येथे पोलिसांची कारवाई  

गडचिरोली : आलापल्ली-सिरोंचा रोडवर कमलापुर टि-पॉईंट जवळ सापळा रचुन पोलिसांनी ट्रक व अवैध दारूसह २५ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ट्रक चालक व क्लिनर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध उपपोस्टे रेपनपल्ली येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जिल्हयात दारुबंदी असुन, आगामी विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने त्याविरुध्द पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अवैध दारुविक्री करणाऱ्यावर अंकुश लावण्याबाबत आदेश दिले आहेत. 28 सप्टेंबर रोजी ट्रक वाहन क्र. एमएच 12 एफझेड 8931 ने काही इसम अहेरी ते सिरोंचा रोडने अवैध दारुची वाहतुक करणार असल्याची गोपनिय माहिती मिळाली. मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा शशिकांत दसूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी उप-पोस्टे रेपनपल्ली पोउपनि संतोष काजळे यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करुन सदर ठिकाणी रवाना करण्यात आले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे आलापल्ली ते सिरोंचा रोडवर कमलापुर टि-पॉईंट जवळ सापळा रचुन बसले असताना, सकाळी 06:00 वा. चे दरम्यान एक संशयीत ट्रक भरधाव वेगाने येतांना दिसले. त्यावेळी पोलीसांनी वाहन थांबवून वाहनामध्ये असलेल्या इसमांचे नावे विचारले असता, त्यांनी आपले नाव संजय महिपत सावंत (वय 51), रा. मुंढे, ता. कराड, जि. सातारा व त्यासोबतच दुसरा इसम सुनिल प्रकाश पवार (वय 32), रा. जैसिंगपुर, ता. शिरोड, जि. कोल्हापुर असे सांगितले.

पंचासमक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता, त्यात 90 एमएल रॉकेट संत्रा डिस्टिलरी देशी दारुचे 502 बॉक्स, प्रति बॉक्समध्ये 100 नग प्रमाणे एकूण 50,200 नग रॉकेट देशी दारुच्या बॉटल अंदाजे किंमत एकूण 17,57,000/- रुपयांचा दारुचा मुद्देमाल व वाहतुकीकरीता वापरण्यात आलेले जुने टाटा कंपनीचे 2518 सी मॉडेल ट्रक, वाहन क्र. एमएच 12 एफझेड 8931 अंदाजे किंमत 8,00,000/- रुपये असा एकूण अक्षरी २५ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला. घटनेच्या अनुषंगाने उपपोस्टे रेपनपल्ली येथे दिलेल्या तक्रारीवरुन अप.क्र. 11/2024, मदाका कलम 65 (अ), 83 अन्वये आरोपी संजय महिपत सावंत ट्रक चालक व सुनिल प्रकाश पवार व्यवसाय क्लीनर यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश व उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा शशिकांत दसूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी रेपनपल्ली पोउपनि संतोष काजळे, पोउपनि सतिश पवार, मपोउपनि प्रियंका मेश्राम, नापोअं नैताम, पोअं यादव, पोअं गायकवाड, पोअं तुंकलवार, चापोअं चिंतमवार यांनी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button