क्राईमनागपूरमुख्य बातमीविदर्भ

‘माईक स्पाय’ वापरून परीक्षेत हायटेक कॉपी

कॉपीबहाद्दर आरोपीला अटक 

नागपूर : कारागृह पोलिस भरती लेखी परीक्षेत गैरप्रकार होणार नाही असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात एका उमेदवाराने हायटेक कॉपी केली. ‘माइक स्पाय’ या डिव्हाईसच्या माध्यमातून पेपर सोडविणाऱ्या कॉपीबहाद्दराला पोलिसांनी अटक केली आहे. मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

राज्यभरात पोलिस भरती सुरू असून, सध्या लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेत कुणीही कॉपी करू नये म्हणून दक्षता घेण्यात येत आहे. ‘स्पाय माइक’च्या मदतीने कॉपी करून पेपर सोडवत असल्याची कुणकुण पोलिस अधिकाऱ्यांना होती. मानकापूर येथील क्रीडा संकुलात कारागृह शिपाई पद भरती २०२२-२३ साठी लेखी चाचणी परीक्षा घेतली जात आहे. २९ सप्टेंबरला दुपारी चाचणी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत दुपारी ३:२० वाजण्याच्या सुमारास ‘चेस्ट’ क्रमांक २५०३७ असलेला आरोपी उमेदवार किसन जोनवाल (बाभुळगाव, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर) याने परीक्षा उतीर्ण होण्याकरिता बाहेरील त्याचा साथीदार आरोपी जीवन काकरवाल (वय २९) रघुनाथपूर वाडी, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर याच्यासोबत कट रचला. ते परीक्षेतील प्रश्न ‘माईक स्पाय अशा इलेक्ट्रानिक डिव्हाईसच्या वापराने सोडवत असल्याचे दिसून आले. जीवन बाहेरून किसनला उत्तरे सांगत होता. मात्र, पोलिसांनी किसनला रंगेहाथ पकडले.

मानकापूर पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (२), (४), ६१(२), (ए), २२३ सहकलम ६६ (ड) आयटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किसनचा साथीदार जीवन काकरवाल फरार झाला आहे.

परीक्षा केंद्रावर उमेदवारांची सखोल तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, तरीदेखील किसन हा स्पाय माइक घेऊन परीक्षा केंद्रात पोहोचला. त्याने काही प्रश्नांची उत्तरेदेखील त्यामाध्यमातून लिहिली होती. हा प्रकार सुरू असताना केंद्रावरील पर्यवेक्षकांच्या नजरेत हा प्रकार आला नाही का व तपासणीत दुर्लक्ष कसे काय झाले, असा सवाल उपस्थित होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button