
चंद्रपूर : वाहन चालक-मालकांच्या असलेल्या समस्या कडे दुर्लक्ष करू नका तर आम्हालाही न्याय द्या या मागणीसाठी जय संघर्ष वाहन चालक-मालक संघटना सावलीच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात योजना देश पातळीवर लागू करण्यात यावी, कारण सदरील योजनेचा महाराष्ट्रातील प्रवाशांना देशातील इतर राज्यामध्ये लाभ मिळत नाही. त्यामुळे इतरही राज्यात हि योजना लागू करण्यात यावी. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वाहन कर जास्तीचा आहे, तो कमी करण्यात यावा. दलित आणि आदिवासी प्रमाणे वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी कडक कायदा करण्यात यावा. कारण नुकतेच पश्चिम बंगालमध्ये आपल्या टाकळीभान अहमदनगर येथील वाहन चालकास जमावाने बेदम मारहाण करुन जिव घेतला. कधी गाडी मालक चालकाला मारहाण करतो तर कधी टोल नाक्यावरील कर्मचारी मारहाण करतात तर कधी वाहतुक शाखेचे पोलिस कर्मचारी देखील हात साफ करून घेतात. या सर्वांना आळा बसण्यासाठी ड्रायव्हर सुरक्षा कायदा होणे अत्यंत गरजेचे आहे.
तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाच्या माध्यमाने एस.टी. च्या प्रवासात शालेय विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक तसेच महिलांना सरसकट अर्ध्या टिकीटाची सवलत देऊन टॅक्सी व्यवसायिकाचे पूर्णता कंबरडे मोडले आहे. तरी पण आपल्या राज्या मध्ये इतर राज्यांच्या तुलनेत रोड टॅक्स, व्यवसायकर हे जास्तीचे आहेत. इत्यादी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश प्रचार प्रसार प्रमुख सुधीर टोंगे, चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष उमेश आजबले, चंद्रपुर जिल्हा सह कोषाध्यक्ष रवि झरकर, राजु देशमुख, एकनाथ ठाकुर, मुकेश भुरसे, खुशाल हुलके, मंगेश शेट्टे, लखन परोते आदी उपस्थित होते.



