गडचिरोलीविदर्भ

सुरजागड-गट्टा रस्ता दुरुस्तीला वेग! ; आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या पुढाकाराने नागरिकांना मोठा दिलासा

हर्षवर्धन आत्राम यांच्या पाठपुराव्याला यश ; खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

एटापल्ली : तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सुरजागड ते गट्टा या रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली होती, ज्यामुळे नागरिकांना प्रवासात प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील दळणवळण सुलभ होणार असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची भेट घेतली होती. त्यांना निवेदनाद्वारे या मार्गावरील समस्यांची माहिती देऊन रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी केली होती. या मागणीची गंभीर दखल घेत आमदार आत्राम यांनी संबंधित विभागाला हे काम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या कडक सूचना दिल्या होत्या.

आमदार आत्राम यांच्या सूचनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाला गती दिली आहे. सद्यस्थितीत सुरजागड ते नेडेर या टप्प्यातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या वाहनांना आता अडथळ्याविना प्रवास करता येणार आहे. उर्वरित मार्गाचे कामही लवकरच पूर्ण केले जाणार आहे.

सुरू असलेल्या कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी बेबी लेकामी, राजू नरोटे, लक्ष्मण नरोटे, गिरिश नरोटे, उमेश हिचामी, जरेवाडा येथील उपसरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरजागड ते गट्टा हा मार्ग दुर्गम भागाला जोडणारा मुख्य दुवा आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे केवळ प्रवाशांचा वेळ वाचणार नाही, तर आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य सेवा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणे सोपे होईल. या कामामुळे परिसराच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला नक्कीच गती मिळेल, असा आशावाद स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button