गडचिरोलीविदर्भ

“रस्ते की मृत्यूचे सापळे?” : चामोर्शी तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून अतुल गण्यारपवार आक्रमक; आंदोलनाचा इशारा

खराब रस्त्यांमुळे शेतकरी हवालदिल ; पुलांमधील लोखंडी रॉड बाहेर आल्याने अपघातांचे सत्र सुरूच

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मुख्य रस्त्यांसह ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, हे रस्ते आता प्रवाशांसाठी ‘मृत्यूचे सापळे’ ठरत आहेत. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

केवळ रस्तेच नाही, तर या भागातील पुलांची स्थितीही चिंताजनक आहे. अनेक पुलांवर मोठमोठे खड्डे पडले असून, बांधकामातील लोखंडी रॉड (सळया) बाहेर आल्या आहेत. यामुळे वाहनांचे टायर पंक्चर होणे, दुचाकी घसरणे असे प्रकार रोज घडत आहेत. अनेक निष्पाप नागरिकांना या खराब रस्त्यांमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर अनेक जण कायमचे अपंग झाले आहेत.

सध्या कापूस, धान आणि इतर शेतमालाचा हंगाम सुरू आहे. मात्र, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांना आपला माल कोनसरी किंवा इतर बाजारपेठांत नेणे कठीण झाले आहे. वाहतुकीचा खर्च वाढत असून खराब रस्त्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे गण्यारपवार यांनी नमूद केले.

तालुक्यातील चामोर्शी ते भेंडाळा -हरणघाट, भेंडाळा ते गणपूर ते अनखोडा– आष्टी, येनापूर ते लक्ष्मणपूर मुधोली चक नं.2 ते जयरामपूर, चामोर्शी ते आमगाव ते भाडभिडी–हळदवाही ते रेगडी, चामोर्शी ते घोट ते रेगडी, कुनघाडा ते मुर्मुरी ते पावीमुरांडा, रेखेगाव ते अनंतपूर, चामोर्शी ते जामगिरी–रामकृष्णपूर ते कोनसरी, येनापूर ते सुभाषग्राम, आमगाव महाल ते विसापूर–तळोधी, सोनापूर ते मारोडा–जामागिरी ते करकापल्ली–विष्णुपूर, मार्कंडा ते फराडा ते मोहुर्ली–ते–घारगाव–हरणघाट, भेंडाळा ते फोकुर्डी ते चामोर्शी, चामोर्शी ते चाकलपेठ–मुरखळा माल–नवेगाव ते लखमापूर बोरी, चामोर्शी ते वागदरा ते रामसागर–लखमापूर बोरी, चामोर्शी ते मुरखळा चक–वाकडी, घोट ते सुभाषग्राम ते कंसोबा मार्कंडा ते आष्टी, तसेच वाघोली ते हरणघाट या रस्त्यांवरून प्रवास करणे आता जिकिरीचे झाले आहे.

अतुल गण्यारपवार यांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा देताना म्हटले की, “रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अनेकदा मागणी करूनही प्रशासन ढिम्म आहे. आता शेतकऱ्यांच्या सोसाची अंत पाहू नका. जर तात्काळ डांबरीकरण आणि पुलांची दुरुस्ती हाती घेतली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडेल.” या मागणीमुळे आता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button