
गोंदिया : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया येथील बाह्यरुग्ण विभागामध्ये 1 ऑक्टोबर 2024 रोजी आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमीत्त ज्येष्ठ नागरिकांकरीता वार्षिक आरोग्य तपासणी कार्डचे वितरण व ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिगांबर मरसकोल्हे, डॉ. स्वप्नील रंगारी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बाह्यरुग्ण विभागामध्ये उपस्थित डॉक्टर, कर्मचारी व ज्येष्ठ नागरिक यांना अधिष्ठाता डॉ. घोरपडे यांनी आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमीत्त आजचा वृध्द हा भविष्याचा मार्गदर्शक आहे, त्यांचे आरोग्य सांभाळणे अत्यंत महत्वाचे आहे असे सांगितले. त्याचप्रमाणे रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना वर्षातून दोनदा मिळणाऱ्या नि:शुल्क रुग्णसेवा आठवड्याच्या दर गुरुवार व शुक्रवार रोजी मिळणार यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
यानिमित्ताने एकूण 40 ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक आरोग्य कार्ड उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वरिष्ठ परिचारिका मिनाक्षी बिसेन, श्रृती कांबळे, सुरभी आडे, समाजसेवा विभागातील अधीक्षक मारोती कुचनकर, अरविंद शंभरकर, गोपाली खोटे, रोशन मस्के, योगेश सोनवाने, पुजा शिंदे, पुजा डांगोरे यांनी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन समाजसेवा अधीक्षक मारोती कुचनकर यांनी केले. कार्यक्रमासाठी सचिन ढोले, अजय सोळंकी, धीरज चव्हाण यांनी सहकार्य केले.



