
गोंदिया : विद्यार्थ्यांना संस्कार आणि शिक्षण देणाऱ्या शिक्षकानेच पुन्हा एकदा गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासल्याचा संतापजनक प्रकार गोंदिया तालुक्यातील रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या लंबाटोला (गिरोला) येथे उघडकीस आला आहे. जि. प. प्राथमिक शाळेतील संजय अग्रवाल (वय ५५, रा. गोंदिया) या विकृत मनोवृत्तीच्या शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली असून, पोलिसांनी आरोपी शिक्षकावर ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या ग्राम लंबाटोला (गिरोला) येथील प्राथमिक शाळेत शनिवारी (दि. २५ जुलै) सकाळी १० ते ११ वाजेच्या सुमारास शिक्षक संजय अग्रवाल याने एका अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. या घटनेची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी व पालकांनी रावणवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
ग्रामस्थांच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी शिक्षक संजय अग्रवाल याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ८ आणि १० अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक शेवते यांच्या नेतृत्वात आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. या संदर्भात गोंदियाचे गटशिक्षणाधिकारी एम. एल. मेश्राम यांना विचारणा केली असता, “पोलीस कारवाई पूर्ण झाल्यावर व पंचायत समितीकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित शिक्षकाच्या निलंबनाचा प्रस्ताव तात्काळ जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले.
आरोपी शिक्षक संजय अग्रवाल याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तो गोंदिया तालुक्यातील डांगोली येथे कार्यरत असतानाही त्याच्यावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पहिल्या घटनेनंतरही त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नाही, उलट प्रशासकीय दुर्लक्षामुळेच त्याने पुन्हा हे धाडस केल्याचा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
वारंवार विनयभंगासारखे गंभीर गुन्हे दाखल होऊनही असा विकृत शिक्षक अजूनही सेवेत कसा? असा संतप्त सवाल आता पालक आणि नागरिकांकडून विचारला जात आहे. शिक्षण विभागाने या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेऊन संबंधित शिक्षकाला तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे, अशी जोरदार मागणी लंबाटोला (गिरोला) येथील ग्रामस्थांनी केली आहे.



