मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात 25 प्रशिक्षणार्थी झाले रुजू

चंद्रपूर/गडचिरोली : शैक्षणिक व महावितरणमधील विविध संवर्गातील कामाचे स्वरुप विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात 25 तरुणांची निवड करण्यात आली आहे.
राज्यातील तरुणांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी तसेच औद्योगिक वाटचालीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सन 2024-25 पासून सुरु करण्यात आली असून या योजनेचा भाग म्हणून महावितरणमध्ये 25 तरुणांना सहा महिन्यांच्या प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. शैक्षणिक अर्हता आणि कामाच्या स्वरुपानुसार मंजूर पदाच्या 5 टक्के पदासाठी तरुणांची महावितरणच्या जिल्हा कार्यालयामार्फत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.
विविध संवर्गानुसार निवडण्यात आलेल्या तरुणांमध्ये 5 जणांना निम्नस्तर लिपिक (लेखा), 4 तरुणांना निम्नस्तर लिपिक (मासं), आणि 16 तंत्रज्ञ पदाकरीता निवड करण्यात आलेली असून तंत्रज्ञ या पदासाठी 8000, निम्नस्तर लिपिक (मासं व लेखा) या पदासाठी 10,000 रुपयांचे विद्यावेतन शासनाकडून प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी ऑनलाइन पध्दतीने आलेल्या अर्जाची मुख्य अभियंता हरीश गजबे यांच्या निर्देशानुसार अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे आणि सहाय्यक महाव्यवस्थापक (प्रभारी) सुशील विखार यांच्या पुढाकाराने शैक्षणिक गुणवत्तेप्रमाणे निवड करुन 25 तरुणांना प्रशिक्षणाकरिता रुजू करुन घेण्यात आले आहे.



