
भंडारा : नवरात्र उत्सवात लायटिंगचे काम करीत असताना विजेचा धक्का लागल्याने गंभीर झालेल्या तरुणाचा भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ४ ऑक्टोबरला मृत्यू झाला. या घटनेमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव दिवाकर वासुदेव सेलोकर (वय ३७) रा. कोंढा असे आहे.
सध्या नवरात्र उत्सव सर्वत्र सुरू आहे. दिवाकर सेलोकर मजुरीने मंडप डेकोरेशन मालकाकडे इलेक्ट्रिकचे काम करीत होता. ३ ऑक्टोबर रोजी दुर्गा उत्सवात इलेक्ट्रिक माळ लावत असताना त्याला विजेचा धक्का लागला. लगेच प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढा येथे उपचाराकरिता नेण्यात आले. त्याच्यावर उपचार करून नातेवाईकांनी घरी आणले. ४ ऑक्टोबरला सकाळी, आपल्या उजव्या पायाची नस लागली असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. त्यामुळे भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यासाठी व एक्स-रे काढण्यासाठी सामान्य रुग्णालयात जात असताना त्यास अकस्मात झटका आला. त्यामुळे रुग्णालयात भरती केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.
या प्रकरणी भंडारा येथील पोलिसांनी मार्ग दाखल करून कलम १९४ बी.एन.एस.एस. अन्यवे दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार सुभाष मस्के करीत आहेत.



