नागपूरविदर्भ

आता नागपूर विभागातून धावणार मुजफ्फरपूर-चारलापल्ली अमृत भारत एक्स्प्रेस ; १४ ऑक्टोबरपासून सेवेत

नागपूर आणि बल्लारशाह स्थानकावर थांबा

नागपूर: ‘भारताची सुपरफास्ट एक्स्प्रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमृत भारत एक्स्प्रेसची एक नवीन ट्रेन आता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून धावणार आहे. मुजफ्फरपूर-चारलापल्ली-मुजफ्फरपूर (१५२९४/१५२९५) ही ती नवीन सुपरफास्ट एक्स्प्रेस असून, ती नागपूर आणि बल्लारशाह या दोन महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे. ही नवीन ट्रेन १४ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार असून, आठवड्यातून दोन दिवस प्रवाशांना सेवा देईल.

अमृत भारत एक्स्प्रेस ही अन्य रेल्वे गाड्यांच्या तुलनेत अधिक चांगल्या सोयीसुविधा आणि अतिजलद सेवा देणारी ट्रेन म्हणून ओळखली जाते.

मंगळवारी १४ ऑक्टोबरला सकाळी १०:४० वाजता मुजफ्फरपूर रेल्वे स्थानकावरून प्रवासाला निघेल आणि तब्बल ३८ तासांनंतर ती बुधवारी १५ ऑक्टोबरला रात्री ११:५० वाजता चारलापल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचेल. यावेळी ही गाडी बुधवारी १५ ऑक्टोबरला दुपारी १२:३० वाजता नागपूर स्थानकावर तर सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी बल्लारशाह स्थानकावर पोहोचेल. या दोन्ही स्थानकावर पाच मिनिटांचा थांबा घेतल्यानंतर ही गाडी पुढे प्रस्थान करेल.

त्याचप्रमाणे गाडी क्रमांक १५२९५ चारलापल्ली मुजफ्फरपूर ही ट्रेन चारलापल्ली स्थानकावरून गुरुवारी १६ ऑक्टोबरला पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी सुटेल आणि शुक्रवारी १७ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता मुजफ्फरपूर स्थानकावर पोहोचेल. या दरम्यान ही गाडी बल्लारशाह स्थानकावर गुरुवारी सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी तर नागपूर स्थानकावर दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी पोहोचेल. दोन्ही स्थानकावर या गाडीला ५-५ मिनिटांचा थांबा आहे.

या दोन्ही गाड्यांना प्रत्येकी २२ कोच असणार आहेत. ही नवीन अमृत भारत एक्स्प्रेस बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या सहा राज्यांना जोडणार आहे.

दिवाळी आणि छटपूजेनिमित्त नागपूर विभागातून आंध्र प्रदेश, तेलंगणा तसेच बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांत जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. अशा वेळी ही नवीन सुपरफास्ट गाडी सुरू होणार असल्याने प्रवाशांसाठी ती अधिक सोयीची ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button