गडचिरोलीविदर्भ

गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगमध्ये रोमांचक क्रिकेट सामन्यांचा थरार!

२० ते २३ फेब्रुवारी दरम्यान रंगणार सामने

जिल्ह्यात क्रीडासंस्कृतीचा नवा अध्याय ; आठ संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

गडचिरोली : लाॅयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग (GDPL) ही जिल्ह्यातील पहिलीच भव्य क्रिकेट स्पर्धा असून या स्पर्धेत रोमांचक सामन्यांचा थरार बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरली आहे. या स्पर्धेत गडचिरोलीच्या १२ तालुक्यांतील संघांसह पोलिस, महसूल, वन आणि लॉयड्स या विभागांचे संघ एकमेकांविरुद्ध विजेतेपदासाठी कडवी झुंज देत आहेत.

या प्रतिष्ठित स्पर्धेचे उद्घाटन भारतीय क्रिकेटचा दिग्गज खेळाडू आणि सुप्रसिद्ध क्रीडा समालोचक रवी शास्त्री यांच्या हस्ते झाले. त्यांच्या उपस्थितीने या स्पर्धेला वेगळीच प्रतिष्ठा मिळाली असून संपूर्ण जिल्ह्यात क्रीडाप्रेमींचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. आतापर्यंत साखळी फेरीतील २४ रोमांचक सामने पार पडले आहेत. स्पर्धेतील चुरस दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक संघाने उत्कृष्ट कामगिरी करत पुढच्या फेरीसाठी आपली दावेदारी सादर केली.

अखेर गडचिरोली हरिकेन्स, कुरखेडा लायन्स, सिरोंचा नाईट रेंजर्स, गडचिरोली पोलिस कमांडो वॉरियर्स, आरमोरी स्टार हिटर्स, लॉयड्स डायमंड्स, धानोरा रॉयल रायनोस आणि चामोर्शी ईगल्स या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. २० ते २३ फेब्रुवारी दरम्यान या संघांमध्ये चुरशीची लढत रंगणार आहे. या स्पर्धेच्या रोमांचकतेत भर घालण्यासाठी महिला क्रिकेट प्रदर्शनीय सामनादेखील आयोजित केला जाणार आहे, हा उपक्रम महिला खेळाडूंना मोठ्या संधी देणारा महत्त्वाचा टप्पा ठरेल. ही भव्य स्पर्धा शेवटच्या टप्प्यात प्रवेश करत असताना गडचिरोलीतील क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता आहे.

हा उपक्रम केवळ क्रिकेटपुरता मर्यादित नसून जिल्ह्यातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देत क्रीडासंस्कृतीला बळकटी देणारा आहे. गडचिरोली जिल्हा प्रीमियर लीगने संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. स्थानिक खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. पुढील काही दिवसांत या स्पर्धेचा उत्कंठावर्धक शेवट होणार असून गडचिरोली क्रिकेटच्या नव्या पर्वाला सामोरे जाणार आहे.  GDPL च्या अंतिम फेरीसाठी तयार राहा, गडचिरोलीच्या पहिल्या क्रिकेट चॅम्पियनचा साक्षीदार व्हा! असे आयोजकांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button