
नागपूरमध्ये केवळ ४०% वाहनांवरच प्लेट्स; आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ
नागपूर : उपराजधानीतील जुन्या वाहनांच्या मालकांसाठी एक मोठी बातमी आहे. वाहनांवर ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (HSRP) बसवण्याची आज, ३० नोव्हेंबर रोजी संपणारी अंतिम मुदत राज्य परिवहन विभागाने पुन्हा एकदा वाढवली आहे. परिवहन आयुक्तांनी शनिवारी रात्री उशिरा काढलेल्या पत्राद्वारे ही मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, ही मुदतवाढ देण्याची पाचवी वेळ आहे, ज्यामागे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे कारण पुढे करण्यात आले आहे. परिवहन विभागाकडून वारंवार मुदतवाढ दिली जात असतानाही, नागपूर विभागाने HSRP बसवण्याच्या कामात अजूनही अपेक्षित वेग घेतलेला नाही. नागपूरच्या तिन्ही आरटीओ कार्यालयांतर्गत येणाऱ्या केवळ ४० टक्क्यांच्या आसपास जुन्या वाहनांवरच आतापर्यंत HSRP बसविण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर ग्रामीणमध्ये (एमएच ४०) २०१९ पूर्वीची एकूण ५ लाख ६५ हजार वाहने आहेत. ऑक्टोबर महिन्यापर्यंत यातील २ लाख २५ हजार म्हणजे ३९.८२ टक्के वाहनांना एचएसआरपी बसविण्यात आली. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर अंतर्गत (एमएच ३१) येणाऱ्या ४ लाख ३७ हजार ३१३ जुन्या वाहनांपैकी १ लाख ७२ हजार ७२२ वाहनांना एचएसआरपी बसविण्यात आली आहे. टक्केवारीनुसार हे प्रमाण ३९.४९ टक्के आहे, तर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरमध्ये (एमएच ४९) ४ लाख ३६ हजार १६० जुनी वाहने आहेत. यातील ४२.२० टक्के वाहनांना एचएसआरपी लागली आहे.
आरटीओ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, १ जानेवारी २०२६ नंतर कोणतीही मुदतवाढ मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे ही शेवटची संधी आहे. ज्या वाहनांवर ‘एचएसआरपी’ नसेल, त्यांच्यावर १ जानेवारीपासून कारवाईला सुरुवात होईल. पहिल्या गुन्ह्यासाठी ₹५०० आणि दुसऱ्या गुन्ह्यासाठी ₹१,५०० दंड आकारला जाणार आहे. या दंड आणि त्रासापासून वाचण्यासाठी तातडीने ‘transport.maharashtra.gov.in’ या शासकीय संकेतस्थळावर जाऊन ‘एचएसआरपी’ बसवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन आरटीओ अधिकाऱ्यांनी केले आहे.



