गडचिरोलीमहाराष्ट्रमुख्य बातमीमुंबईविदर्भ

नक्षल चळवळीशी संबंध असल्याचा आरोप असलेले प्रो. जी.एन. साईबाबा यांचे निधन

गडचिरोली : नक्षल चळवळीशी संबंध असल्याच्या आरोपात अनेक वर्षे तुरुंगवास भोगलेले आणि नंतर निर्दोष सुटका झालेले दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) माजी प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांचे शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास गॉल ब्लॅडरमधील संसर्ग, किडनी आणि हॉर्ट अटॅकने हैदराबाद येथील एमआयएमएस रुग्णालयात निधन झाले.

पाच दिवसांपूर्वीच साईबाबांच्या गॉल ब्लॅडरची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर प्रकृती सुधारत असतानाच अचानक गॉल ब्लॅडरमध्ये पू तयार झाला. ताप आणि पाठीचे दुखणे सुरु झाले. गॉल ब्लॅडरमधून पू काढणे सुरु असताना पोटातून रक्तस्त्राव सुरु झाला. रक्तदाबही कमी झाला. मूत्रपिंड निकामी होण्यास सुरुवात झाली आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

दिल्ली विद्यापीठाचे प्रो. जी.एन. साईबाबा (४७) रा. दिल्ली, यांच्यासह जेएनयूचा विद्यार्थी हेम मिश्रा (३२) रा. कुंजबर्गल, जि. आलमोडा, उत्तराखंड, पत्रकार प्रशांत राही (५४) रा. डेहराडून उत्तराखंड, महेश तिरकी (२२) व पांडू नरोटे (२७) दोघेही रा. मुरेवाडा, ता. एटापल्ली यांच्यावर २०१३ मध्ये अहेरी पोलिस ठाण्यात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक अधिनियम १९६७ च्या कलम १३,१८,२०, ३८, ३९ तसेच भादंवि १२० (ब) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. ९ मे २०१४ रोजी प्रो. साईबाबा यांना दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थातून अटक करण्यात आली होती. पुढे ७ मार्च २०१७ रोजी गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने उपरोक्त आरोपींना आजन्म कारावासाची, तर अन्य एक आरोपी विजय तिरकी (३०) रा. बेलोडा, ता. पाखांजूर, छत्तीसगड यास १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली होती.

त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपिल केले होते. १४ ऑक्टोबर २०२२ मध्ये नागपूर खंडपीठाने त्यांना कारागृहात सुटका करण्याचे आदेश दिले होते. परंतु राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपिल केले आणि दुसऱ्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. त्यानंतर मार्च २०२४ मध्ये नागपूर खंडपीठाने सरकारी पक्ष साईबाबा यांच्यावरील आरोप सिद्ध करु न शकल्याचे कारण देत त्यांची सुटका केली. शारीरिकदृष्ट्या ७० टक्क्यांहून अधिक व्यंग असलेले प्रो. साईबाबा यांची प्रकृती कारागृहातही खालावली होती. तेथून सुटका झाल्यानंतरही व्याधींनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. अखेर शनिवारी त्यांचे निधन झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button