
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी बंगाली समाजाच्या मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या समस्यांचे निदान केले. प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास निधी आणून गावांचा विकास केला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार डॉ. होळी यांच्या पाठीशी बंगाली समाजाने खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन इस्कॉन मंदिराचे परमेश्वर दास महाराज यांनी रवींद्रपूर येथील बंगाली समाज बांधवांच्या मेळाव्याच्या प्रसंगी केले.
आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते बंगाली समाज बांधवांच्या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष दीपक हलदार, प्रदेश अध्यक्ष निखिल भारत, रणजित मंडल, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, बिनाराणी होळी, सरपंच सोनी मंडल, सरपंच रतन सरकार, सुभाष सरकार, मंटूलाल हलदार, बिधान बैद्य, सतीश रॉय, अनिता रॉय, रुंम्पा शहा, सुनील मंडल, गयाली, लक्ष्मी सरकार, विमल सेन, प्रकाश सरकार, निरंजन बाच्छाळ सुमंत कयाला, रतन मंडल तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना परमेश्वर दास महाराज म्हणाले की, बार्टीच्या माध्यमातून बंगाली समाजाचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करण्यात आले ते संपूर्ण श्रेय आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडे जाते. त्यांनी बंगाली समाजाच्या अतिक्रमित जमिनीच्या मोजमापासाठी निधी उपलब्ध करून दिला. बंगाली समाजातील विद्यार्थी पोलीस दलात लागावे यासाठी ईडबलूएस माध्यमातून भरती प्रक्रिया राबवून घेतली. त्यामुळे अनेक बंगाली उमेदवार पोलिसांमध्ये भरती होवू शकले. बंगाली भाषिक शिक्षकांची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे. बंगाली भाषेतून पुस्तकांची छपाई करण्यात आली. प्रत्येक बंगाली गावात मागणीप्रमाणे सभागृहांची निर्मिती, रस्ते, नाल्या व मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या. असे काम आजपर्यंतच्या कोणत्याही आमदाराने केले नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये संपूर्ण बंगाली समाजाने आमदार डॉ. होळी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.



