
अहेरी जवळील दीना नदीच्या पुलावरील भीषण अपघात ; कोलपाकवार कुटुंबावर दुखाचा डोंगर
अहेरी : एका दुःखातून सावरत नाही तोच नियतीने कोलपाकवार कुटुंबावर दुसरा भीषण आघात केला आहे. नागेपल्ली येथील नातेवाईकाच्या अंत्यविधी आटोपून आपल्या घराकडे परतणाऱ्या नातेवाईकांची कार दीना नदीच्या पुलावरून खाली कोसळली. या भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू झाला असून, अन्य तीन जण गंभीर जखमी आहेत. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी, २० जानेवारी रोजी दुपारी खमणचेरू आणि बोरी दरम्यान घडली.
नागेपल्ली येथील रवींद्र तंगडपल्लीवार यांचा मृतदेह १९ जानेवारी रोजी जंगल परिसरात आढळून आला होता. २० जानेवारी रोजी सकाळी त्यांच्यावर नागेपल्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यविधीसाठी आष्टी आणि बोरी येथून कोलपाकवार कुटुंबीय आले होते. विधी आटोपून यादव विठ्ठलराव कोलपाकवार (७३, रा. आष्टी), त्यांच्या पत्नी अर्चना, मुलगा अभिजित आणि बोरी येथील चुलत भाऊ सुनील मुरलीधर कोलपाकवार (५५) व काकू पद्मा सत्यनारायण कोलपाकवार हे पाचही जण कारने (एम एच ३३ व्हि.८२४९) परतत होते. खमणचेरू ओलांडल्यानंतर दीना नदीच्या पुलावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पुलावरून खाली कोसळली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून वाहनातील पाचही जण गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर जखमींना तातडीने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान यादव विठ्तलराव कोलपाकवार (७३) आणि सुनील मुरलीधर कोलपाकवार (५५) या दोन चुलत भावांची प्राणज्योत मालवली. या अपघातात कार चालक अभिजित यादव कोलपाकवार (४०), अर्चना यादव कोलपाकवार आणि पद्मा सत्यनारायण कोलपाकवार हे तिघेही गंभीर जखमी आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, अभिजित कोलपाकवार हा गाडी चालवत होता. आष्टीवरून आई-वडिलांना घेऊन निघाल्यावर त्याने बोरी येथून चुलत काका सुनील आणि काकू पद्मा यांना गाडीत घेतले होते. अंत्यविधी आटोपून परतताना काका-काकूंना बोरी येथे सोडून अभिजित आई-वडिलांना घेऊन आष्टीला जाणार होता. मात्र, घरापासून काही अंतरावर असतानाच काळाने घाला घातला. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींच्या मृत्यूने आष्टी आणि बोरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



