
गजबजलेल्या फवारा चौकातील घटनेने व्यापारी हादरले, तिघांवर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल
कुरखेडा : उधारीचे पैसे परत मागितल्याचा राग मनात धरून एका पानठेला चालकाने आपल्या भावाच्या आणि दोन स्थानिक गावगुंडांच्या मदतीने काका-पुतण्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना कुरखेडा येथे घडली आहे. शहरातील गजबजलेल्या फवारा चौकात शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास हे रक्तरंजित थरारनाट्य घडले. या हल्ल्यात काका व पुतण्या दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
याप्रकरणी कुरखेडा पोलिसांनी मध्यरात्रीच मुख्य आरोपी विनोद खंडाईतसह त्याच्या साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्ग आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, वडसा येथील रहिवासी शुभम कृष्णाजी आंबेकर (वय ३० वर्षे, व्यवसाय-शेती) यांची आरोपी विनोद श्रावण खंडाईत याच्याशी ओळख होती. १७ जुलै २०२५ रोजी विनोदच्या सांगण्यावरून आणि त्याच्या गरजेपोटी शुभमने त्याच्या बँक खात्यात १ लाख रुपये ऑनलाईन पाठवले होते. “महिनाभरात पैसे परत करतो,” असे आश्वासन विनोदने दिले होते. मात्र, त्यानंतर शुभमने ३ ते ४ वेळा तगादा लावूनही विनोदने पैसे देण्यास टाळाटाळ केली. शेवटी हताश होऊन शुभमने हा प्रकार आपले काका घनशाम वासुदेव आंबेकर (रा. कोसी) यांना सांगितला.
शनिवार, ३० मे रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शुभम व त्याचे काका कुरखेडा येथील विनोदच्या ‘अपना पानठेला’ येथे गेले असता, त्याचा भाऊ विकास खंडाईत याने “विनोद गडचिरोलीला गेला असून सायंकाळी या,” असे सांगून त्यांना परत पाठवले. ठरल्याप्रमाणे सायंकाळी ७ ते ७:३० च्या सुमारास शुभम आणि त्याचे काका पुन्हा पानठेल्यावर पोहोचले. तिथे विनोद आणि विकास दोघेही हजर होते.
शुभमने आपले हक्काचे पैसे मागताच दोघांनीही अचानक रुद्रावतार धारण केला. “एकही रुपया देणार नाही आणि तुला आज जिवंत सोडणार नाही,” असे ओरडत विनोदने शुभमची कॉलर पकडून त्याला जोरात ढकलले. त्याच वेळी विनोदने इशारा करताच बाजूला दबा धरून बसलेले अरबाज आणि परवेज नावाचे दोन गावगुंड हातात लोखंडी रॉड घेऊन समोर आले. काही समजण्याच्या आतच त्यांनी शुभमच्या डोक्यावर लोखंडी रॉडने सपासप वार केले. या हल्ल्यात शुभमच्या डोक्यातून रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या आणि तो जमिनीवर कोसळला.
पुतण्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून काका घनशाम आंबेकर हे त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडले. मात्र, क्रूर हल्लेखोरांनी त्यांच्यावरही दया दाखवली नाही. त्यांनी घनशाम यांच्याही डोक्यावर आणि हातावर लोखंडी रॉडने जबर प्रहार केले, त्यामुळे तेही गंभीर जखमी झाले. मुख्य आरोपी विनोदने खाली पडलेल्या दोघांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि एकाच्या हातातील रॉड हिसकावून शुभमच्या उजव्या खांद्यावर मारला. “पुन्हा कुरखेड्यात दिसलास तर जिवंत कापून टाकीन,” अशी धमकी देऊन हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
सुदैवाने फवारा चौकातील आजूबाजूच्या नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी तातडीने धाव घेत मध्यस्थी केल्यामुळे दोघांचे प्राण वाचले. नागरिकांनी जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे दाखल केले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी शुभम आंबेकर याने दिलेल्या लेखी जबाबावरून कुरखेडा पोलिसांनी आरोपी विनोद श्रावण खंडाईत, विकास खंडाईत, अरबाज आणि परवेज यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास कुरखेडा पोलीस करत असून फरार आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.



