वडसा ते चांदाफोर्ट मेमू पॅसेंजर रेल्वे गाडी पुर्ववत सुरू – आ. कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश

देसाईगंज : गडचिरोली हा आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त जिल्हा असुन देशातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत गडचिरोली जिल्हा मागासलेला असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यात समावेश केलेला आहे. संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा विचार करता सद्यस्थितीत वडसा येथे जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असुन रेल्वे प्रवास करणारे जिल्ह्यातील नागरिक वडसा रेल्वे स्टेशन वर अवलंबून आहेत. असे असताना कोरोना काळात दक्षिण पुर्व मध्य रेल्वे विभागाने वडसा स्टेशन वरून सकाळी ९.०० वाजता सुटणारी ०८८०८ वडसा ते चांदाफोर्ट मेमू पॅसेंजर रेल्वे गाडीसह, ०८८०६ गोंदिया ते वडसा व ०८८०५ चांदाफोर्ट ते गोंदिया या वडसा रेल्वे स्टेशन वरून ये-जा करणाऱ्या मेमू पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद केलेल्या होत्या.
त्यामुळे उद्योगनगरी वडसा सह गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रंचड अडचणीचा सामना करावा लागत असुन त्यांच्या नाहक श्रम, वेळ व पैशाचा अपव्यय होत असल्याचे आमदार कृष्णा गजबे यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव यांना १७ जुलै २०२४ रोजी निवेदनाद्वारे ०८८०८ वडसा ते चांदाफोर्ट मेमू पॅसेंजर रेल्वे गाडीसह, ०८८०६ गोंदिया ते वडसा व ०८८०५ चांदाफोर्ट ते गोंदिया या वडसा रेल्वे स्टेशन वरून ये-जा करणाऱ्या मेमू पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करण्याची विनंती केली होती. तसेच अश्वीनी वैष्णव हे महाराष्ट्र राज्याचे भाजपा निवडणूक प्रभारी असल्याने नुकत्याच पुणे येथे संपन्न झालेल्या भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वर नमूद रेल्वे गाड्या पुर्ववत सुरू करण्याची विनंती केली होती.
सदर विनंतीच्या अनुषंगाने रेल्वे विभागाने सकारात्मक कार्यवाही करुन प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक, द.पु.म.रे. बिलासपूर यांच्या कार्यालयाने ५ सप्टेंबर २०२४ च्या आदेशानुसार बंद करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या पुर्ववत सुरू करण्याची घोषणा केली आहे. ज्यामध्ये ०८८०६ गोंदिया ते वडसा ही रेल्वे गाडी ७ सप्टेंबर २०२४ पासुन तर ०८८०८ वडसा ते चांदा फोर्ट व ०८८०५ चांदा फोर्ट ते गोंदिया या रेल्वे गाड्या ८ सप्टेंबर २०२४ पासुन नियमित सुरू होत आहेत. रेल्वे विभागाने बंद केलेल्या गाड्या पुर्ववत सुरू करुन उद्योग नगरी वडसा शहरासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा दिल्याबद्दल आमदार कृष्णा गजबे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव यांचे आभार मानले.



