माणुसकीला काळिमा फासणारी घटना ; आठ वर्षांच्या अनाथ चिमुकलीवर नातेवाइकानेच केला अत्याचार

कोरची तालुक्यातील घटना ; आरोपीला अटक
कोरची : आठ वर्षांच्या निरागस अनाथ चिमुकलीवर तिच्याच नात्यातील एका नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना तालुक्यात उघडकीस आली आहे. होळीच्या उत्सवात रंगांच्या नावाखाली माणुसकीला काळिमा फासणारा हा प्रकार पाच दिवसांनंतर समोर आला असून, या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अनाथ असून ती आपल्या मामा-मामीकडे वास्तव्यास आहे. होळीच्या दिवशी गावात सर्वजण सण साजरा करण्यात मग्न असताना, आरोपीने या परिस्थितीचा गैरफायदा घेतला. त्याने या चिमुरडीला फूस लावून आपल्या घरी नेले आणि तिथे तिच्यावर पाशवी अत्याचार केला. अत्याचारानंतर “हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देऊन त्याने चिमुकलीचे तोंड दाबले. आरोपीच्या दहशतीमुळे ती पाच दिवस दहशतीखाली आणि शांत होती.
हा धक्कादायक प्रकार पाच दिवसांनंतर समोर आला. पीडितेच्या मामीने तिला आंघोळ घालताना तिच्या शरीरावरील जखमा आणि पोटावर आलेली सूज पाहिली. काहीतरी अघटित घडल्याचा संशय आल्याने मामीने तिला प्रेमाने विश्वासात घेऊन विचारले असता, त्या चिमुकलीने आपल्यावर झालेला अत्याचार कथन केला. हे ऐकताच नातेवाईकांना मोठा धक्का बसला.
घटनेची माहिती मिळताच कोरची पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीवर पोक्सो (POCSO) कायद्याच्या विविध कलमान्वये आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.
“अशा क्रूर घटना समाजासाठी घातक आहेत. अनाथ मुलीवर झालेला हा अन्याय सहन करण्यापलीकडे असून आरोपीला फाशीची किंवा कठोर जन्मठेपेची शिक्षा व्हावी,” अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.



