
गोंदिया : रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत बालाघाट वरून गोंदियाकडे एका वाहनात सुगंधित तंबाखु येत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी १६ जानेवारी रोजी सापळा रचून ते वाहन ताब्यात घेतले असता, त्या वाहनात ६ लाख २७ हजार ४२२ रुपये किमतीची सुगंधित तंबाखू व ७ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण १३ लाख २७ हजार ४२२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सविस्तर असे की, आरोपी वाहन चालक याने वाहन क्रमांक एम.एच. ३५ ए.जे. २६१३ मध्ये सुगंधित तंबाखूच्या जवळपास दहा पिशव्यातून वाहनात भरून बालाघाट वरून निघाला. दरम्यान गोंदियाकडे ते वाहन येत असल्याची गोपनिय माहिती रामनगर पोलिसांच्या डी.बी. पथकाला मिळाली. त्या आधारावर पथकाने सापळा रचून वाहन ताब्यात घेतले. पोलिसांनी अधिक तपास केला असता सदर तंबाखू गोंदिया येथे विक्री करीता नेत असल्याची माहिती दिली. यावेळी पोलिसांनी ६ लाख २७ हजार ४२२ रुपयाची सुगंधित तंबाखू तसेच वाहन जप्त केले. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन यांना तपासासाठी नमुने पाठविले आहेत. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.



