
तरुणाचा मृत्यू ; देव्हाडी येथील हनुमान तलावातील घटना
तुमसर : देव्हाडी येथून स्वगावी परसवाडा (दे.) येथे जाताना दुचाकी अनियंत्रित होऊन दुचाकीसह तरुण तलावात कोसळला. ही घटना देव्हाडी येथील टिळक वॉर्डातील हनुमान तलावात दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. हा तलाव रस्त्याच्या अगदी शेजारी आहे. पोलिस प्रशासनाने तलावातून दुचाकी काढली. तर, सायंकाळी उशिरा तरुणाचा मृतदेह आढळला. ज्ञानेश्वर खराबे (२७, परसवाडा, देव्हाडी) असे मृताचे नाव आहे. तलावाच्या काठावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
ज्ञानेश्वर हा दुचाकी (क्रमांक एम. एच.३१ इ.सी. ९५४७) वरून परसवाडा येथे स्वगावी जात होता. अचानक भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन तो दुचाकीसह तुडुंब भरलेल्या तलावात कोसळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. तलावाशेजारी नागरिकांची घरे आहेत. नागरिक मदतीसाठी धावून आले. पाण्यात बुडालेली दुचाकी काढण्यात आली. ज्ञानेश्वरचा शोध स्थानिक नागरिकांनी घेतला. परंतु त्यांना यश आले नाही. देव्हाडीचे सरपंच आशिष टेंभुरकर तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्याला सुरुवात केली. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गोताखोरांना पाचारण केले. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वरचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. ज्ञानेश्वर हा आई-वडिलांना एकुलता होता. खराबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ज्ञानेश्वरची दुचाकी अनियंत्रित कशी झाली? रस्त्यावरून थेट तलावात तो कसा कोसळला? याचा तपास पोलिस करीत आहेत. हनुमान तलाव हा गावाच्या शेजारीच असून, तलावाच्य काठावरून रस्ता आहे. त्यामुळे सुरक्षितता लक्षात घेऊन तलावाला संरक्षक भिंत बांधण्याची गरज आहे.



