
सिरोंचा : सिरोंचा नगर पंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक ७ मध्ये एका खळबळजनक घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. नगर पंचायतने अधिकृत टेंडर काढून सुरू केलेले कलार समाजाच्या नियोजित समाज भवनाचे बांधकाम ३ एप्रिल रोजी अज्ञात व्यक्तींनी जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृतपणे पाडून टाकले. या घटनेमुळे कलार समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून, दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी समाज आक्रमक झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर समाज भवनाचे काम सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराकडून सुरू करण्यात आले होते. कलार बांधवांनी परंपरेनुसार या जागेचे भूमिपूजन करून बांधकामाला सुरुवात केली होती. मात्र, शुक्रवारी ३ एप्रिल रोजी काही समाजकंटकांनी जेसीबी आणून सुरू असलेले बांधकाम जमीनदोस्त केले. इतकेच नव्हे तर, फाउंडेशनसाठी खणलेले गड्डे बुजवून त्यात पूजेचे साहित्यही गाडण्यात आले. या कृत्यामुळे समाजाच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या आहेत.
या घटनेच्या निषेधार्थ ४ एप्रिल रोजी समस्त कलार समाजाच्या शिष्टमंडळाने नगर उपाध्यक्ष श्री. बबलू पाशा यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. शिष्टमंडळाने पुनर्निर्माण: बंद पाडलेले समाज भवनाचे बांधकाम तात्काळ पुन्हा सुरू करण्यात यावे. गुन्हे दाखल करा: सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आणि धार्मिक भावना दुखावणार्या दोषींवर त्वरित गुन्हे दाखल व्हावेत. पुराव्यांची तपासणी: उपलब्ध व्हिडिओ पुराव्यांच्या आधारे संबंधित व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. इत्यादी प्रमुख मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या आहेत.
निवेदन स्वीकारल्यानंतर नगर उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी समाज बांधवांशी संवाद साधला. ते म्हणाले, “हा प्रकार अत्यंत निंदनीय आणि लोकशाहीला काळिमा फासणारा आहे. सरकारी कामात अशा प्रकारे अडथळा आणणे खपवून घेतले जाणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी नगर पंचायत प्रशासन कटिबद्ध आहे.” यावेळी त्यांनी आक्रमक झालेल्या नागरिकांना शांततेचे आवाहन देखील केले.
कलार समाजाने प्रशासनाला २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. जर विहित मुदतीत दोषींवर गुन्हे दाखल झाले नाहीत आणि काम पुन्हा सुरू झाले नाही, तर संपूर्ण तालुक्यातील कलार बांधव रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा समाजातर्फे देण्यात आला आहे.
शहरात सध्या या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. हे कृत्य निव्वळ खोडसाळपणा नसून राजकीय सूडबुद्धीने केले गेल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. आता पोलीस प्रशासन आणि नगर पंचायत यावर काय भूमिका घेते आणि दोषींच्या मुसक्या कधी आवळते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



