गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

भाजपच्या बंडखोरांवर आणि त्यांना साथ देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? – राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वासेकर यांचा सवाल

गडचिरोली : महायुतीचा धर्म न पाळता केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्यांवर आणि त्यांना साथ देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर भाजपने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी केली आहे. अहेरी मतदार संघात काही भाजपचे पदाधिकारी खुलेआमपणे महायुतीच्या उमेदवाराविरूद्ध प्रचार करताना दिसतात. पक्षादेश न पाळता बंडखोर (अपक्ष) उमेदवाराला साथ देण्याच्या या कृतीला भाजपचे समर्थन आहे का? असा सवाल वासेकर यांनी उपस्थित केला आहे.

जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघांपैकी गडचिरोली आणि आरमोरी हे दोन मतदार संघ महायुतीमध्ये भाजपच्या  वाट्याला आले आहेत. या दोन्ही मतदार संघात महायुतीचा घटक पक्ष म्हणून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या उमेदवाराला साथ देत आहे. भाजपचा उमेदवार हा आपला उमेदवार समजून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा धर्म पाळत आहे. पण अहेरीत तीच भूमिका महायुतीचे, अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांच्याबाबत भाजपचे पदाधिकारी घेताना दिसत नाही.

विशेष म्हणजे भाजपच्या जिल्हाध्यक्षांकडून त्याबाबत आतापर्यंत कोणताही इशारा त्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलेला नाही. जर भाजपची हीच भूमिका असेल तर गडचिरोली आणि आरमोरी मतदार संघात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही भाजप उमेदवाराच्या विरोधात प्रचार करायचा का? असा सवाल जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी केला आहे. भाजप हा शिस्त पाळणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. असे असताना बेशिस्तपणे वागणाऱ्या आपल्या नेत्यावर आणि पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्याबाबत भाजप अधिकृतपणे कोणती भूमिका जाहीर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button