
गाट्याटोला येथील घटना ; दागिने व रोख रकमेचा समावेश
गोंदिया : घरी कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी दोन लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. आमगाव तालुक्यातील ग्राम घाटटेमणी-गाट्याटोला येथे २८ ते २९ ऑक्टोबर रोजीदरम्यान ही घटना घडली आहे.
फिर्यादी ममता दुर्गेश सूर्यकर (३७) यांचे मोठे सासरे मरण पावल्याने त्या अंत्यसंस्कारासाठी गेल्या होत्या. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरी कुणीही नसल्याची संधी साधली व दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच घरातून ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र किंमत एक लाख ९७ हजार ११ रुपये, सोन्याचे १० मणी किंमत १३ हजार ९८५ रुपये, साडेतीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानाचे झाले किंमत नऊ हजार ५०० रुपये, सोन्याची अंगठी किंमत १५ हजार रुपये, अडीच ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील रिंग किंमत आठ हजार ५०० रुपये, नाकातील फुली किंमत दोन हजार रुपये, कानातील सोन्याचे एक रिंग किंमत सहा हजार रुपये असे दोन लाख ५१ हजार ९९९ रुपयांचे दागिने, तर आठ हजार ५०० रोख असा एकूण दोन लाख ६० हजार ४९६ रुपयांचा ऐवज लंपास केला.
या घटनेसंदर्भात आमगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम ३३१ (१), ३३१ (४), ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक नरेश शहारे करीत आहेत.



