गडचिरोलीविदर्भ

एकजुटीचा विजय ; 20 वर्षांपासून टिकवून ठेवली ‘दारूविक्रीबंदी’

मुक्तीपथच्या मार्गदर्शनात मोहगाव गाव संघटनेचा यशस्वी लढा 

कुरखेडा : तालुक्यातील मोहगावने एक नवा आदर्श घालून दिला आहे. गाव संघटनेच्या महिलांची वज्रमूठ आणि मुक्तीपथच्या सहकार्यामुळे मागील 20 वर्षांपासून या गावात अवैध दारूविक्री पूर्णतः बंद असून, हे गाव आता ‘दारूमुक्त गाव’ म्हणून नावारूपास आले आहे.

कुरखेडा शहरापासून २२ किमी अंतरावर असलेल्या सोनसरी ग्रामपंचायत अंतर्गत मोहगाव येते. साधारण ३०० ते ३५० लोकसंख्या असलेल्या या आदिवासी बहुल गावात एकेकाळी मोहफुलची दारू विक्री केल्या जात होती. दारूविक्रीमुळे गावातील शांतता भंग पावली होती आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही बिघडलेली परिस्थिती पाहून गावातील महिलांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. परिस्थिती सुधारण्यासाठी महिलांनी ‘गाव संघटना’ स्थापन केली. केवळ ठराव घेऊन न थांबता महिलांनी प्रत्यक्ष कृतीला सुरुवात केली. संघटनेच्या महिलांनी गावात अहिंसक कृतीतून दारू विक्रेत्यांच्या अड्ड्यांवर धाड टाकून दारूची मडकी फोडली. तसेच, पुन्हा दारू न विकण्याची ग्वाही विक्रेत्यांकडून घेतली.

गाव संघटनेने दारूविक्री रोखण्यासाठी अत्यंत कडक नियम लागू केले आहेत. गावात कोणीही दारू विक्री करताना आढळल्यास त्याला गावातून बहिष्कृत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या धाकामुळे आणि महिलांच्या सततच्या पाळतीमुळे आजही गावात दारूचा थेंबही विकला जात नाही. मोहगाव आता केवळ स्वतःपुरते मर्यादित राहिलेले नाही. आपल्या गावातील यश पाहिल्यानंतर या महिलांनी आता शेजारील गावातील दारूविक्री बंद करण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू केले आहेत. गाव कायमस्वरूपी दारूमुक्त ठेवण्यासाठी मुक्तीपथ तालुका चमू, पोलीस पाटील आणि गाव संघटना अहोरात्र प्रयत्न करत आहेत.

“महिलांच्या एकजुटीमुळेच आज आमच्या गावात शांतता आहे. ही दारूविक्री बंदी आम्ही येणाऱ्या पिढीसाठी असाच टिकवून ठेवू.”

–  प्रतिनिधी, मोहगाव गाव संघटना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button