
प्रशासनाने परवानगी नाकारली ; आचारसंहितेच्या अनुषंगाने सादरीकरणाला ब्रेक
गडचिरोली : झाडीपट्टी रंगभूमीच्या नाट्य प्रयोगासाठी ४५ पेक्षा अधिक नाटक कंपन्या सज्ज झाल्या असून, या कंपन्यांनी देसाईगंज (वडसा) येथे बुकिंगसाठी आपले कार्यालय सुरू केले. दिवाळीपासून ग्रामीण भागात झाडीपट्टी रंगभूमीवरील नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी तालमींना सुरुवात झाली, मात्र विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने नाट्यप्रयोग सादरीकरणाला ब्रेक लागला आहे. बलिप्रतिपदा व दिवाळी पाडव्याच्या दिवशी सादर होणाऱ्या झाडीपट्टी रंगभूमीच्या नियोजित नाट्यप्रयोगांना पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने जिल्ह्यात ५० वर नाट्यप्रयोग रद्द करावे लागल्याची माहिती आहे. दरवर्षी दिवाळीपासून ग्रामीण भागात झाडीपट्टीच्या नाट्यप्रयोगाची धूम राहणार आहे. एका नाट्यप्रयोगाला ६०-६५ हजार रुपये कंपनी आकारत असते.
निवडणूक आचारसंहितेमुळे झाडीपट्टी रंगभूमीच्या नामांकित व रसिकांची गर्दी खेचणाऱ्या नाट्यप्रयोगाला पोलिस प्रशासनाची रीतसर परवानगी मिळत नसल्याने असे नाट्यपयोग पूर्णतः बंद आहेत. परिणामी नाट्य कंपनीतील कलावंतांच्या रोजगाराला ब्रेक लागला आहे.
पोलिस प्रशासनाच्या विनापरवानगीने गावागावांत मोफत स्वरूपाच्या दंडार व नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होत आहे. शुक्रवार व शनिवारला गावपातळीवरील स्थानिक कलाकारांचा समावेश असलेले नाट्यप्रयोग मोफत स्वरूपात सादर झाले. आयोजक मंडळी स्वतः शांतता व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळत सदर मनोरंजनाचे प्रयोग यशस्वीरीत्या पार पाडत आहेत.



