गोंदियाविदर्भ

कचारगड यात्रेत आरोग्याचा जागर ; ‘सिकलसेल’ आणि ‘कुष्ठरोग’ निर्मूलनासाठी आरोग्य विभागाचा पुढाकार

लाखो भाविकांच्या उपस्थितीत ‘अरुणोदय’ आणि ‘कुसुम’ मोहिमेचा प्रभावी प्रचार

गोंदिया : आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या सालेकसा तालुक्यातील कचारगड यात्रेत यंदा भक्तीसोबतच आरोग्याचाही जागर पाहायला मिळत आहे. अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात भरणाऱ्या या ५ दिवसीय यात्रेत, जिल्हा आरोग्य विभागातर्फे सिकलसेल आणि कुष्ठरोग जनजागृतीवर विशेष भर दिला जात असून, लाखो भाविकांना आरोग्य सुविधा पुरविल्या जात आहेत.

३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत चालणाऱ्या या यात्रेत महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडसह विविध राज्यांतून लाखो भाविक “पारी कोपार लिंगो” या आपल्या आराध्य दैवताच्या दर्शनासाठी कचारगडच्या गुहेत दाखल होतात. यात्रेच्या दुर्गमतेचा विचार करून प्रशासनाने आरोग्य व्यवस्थेचे चोख नियोजन केले आहे.

जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस गिरी यांनी यात्रेच्या ठिकाणी तीन विशेष आरोग्य स्टॉल्स उभारले आहेत.

या स्टॉल्समध्ये दिवस-रात्र सेवा: वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक-सेविका आणि आशा स्वयंसेविका यांची तैनात करण्यात आली आहे.आरोग्य प्रदर्शनी: राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची आणि विविध शासकीय योजनांची माहिती देणारे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. तात्काळ उपचार: यात्रेदरम्यान उद्भवणाऱ्या किरकोळ आजारांवर भाविकांना जागेवरच प्रथमोपचार दिले जात आहेत.

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून राज्यात सिकलसेल निर्मूलनासाठी ‘अरुणोदय’ अभियान राबविले जात आहे. तसेच कुष्ठरोग मुक्त महाराष्ट्रासाठी ‘कुसुम’ विशेष मोहीम सुरू आहे. कचारगड यात्रेचा मोठा जनसमुदाय लक्षात घेता, डॉ. पारस गिरी यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही आजारांची मोफत तपासणी, निदान, उपचार आणि समुपदेशन या तीनही स्टॉल्सवर केले जात आहे.

आदिवासी बांधवांमध्ये सिकलसेल आणि कुष्ठरोगाबाबत जनजागृती करण्याची ही मोठी संधी आहे. आम्ही यात्रेकरूंना तपासणीसोबतच या आजारांच्या प्रतिबंधात्मक उपायांची माहितीही देत आहोत, अशी माहिती डॉ. पारस गिरी यांनी दिली.

कचारगड यात्रेतील ही ‘आरोग्य वारी’ दुर्गम भागातील नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत असून, भाविकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button