
गडचिरोली : शेतकऱ्यांच्या जमिनी परस्पर कमी किंमतीत खरेदी करून फसवणूक करणाऱ्या दलालांचा गडचिरोली जिल्ह्यात सुळसुळाट वाढला आहे. जोपर्यंत एमआयडीसीकडून अधिकृत जमीन अधिग्रहणाचे आदेश येत नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांनी कोणत्याही खाजगी व्यक्तीला आपली जमीन विकून स्वतःची फसवणूक करू नये, असे कळकळीचे आवाहन भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील अहेरी, आलापल्ली, लगाम, ईल्लुर, ठाकरी, भेंडाळा, मार्कंडादेव, आमगाव, घोट, आरमोरी, वडसा यांसारख्या अनेक भागांमध्ये ‘आम्ही तुम्हाला जमिनीचा योग्य मोबदला आणि नोकरी मिळवून देऊ’ असे खोटे आश्वासन देऊन काही दलाल शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. काही शेतकरी या आमिषाला बळी पडले असून, ते आपली जमीन कमी किमतीत विकत आहेत.
डॉ. होळी यांनी स्पष्ट केले आहे की, उद्योगासाठी जमीन खरेदी करायची असल्यास एमआयडीसी अधिकृतपणे अधिसूचना जारी करते. त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार योग्य मोबदला आणि नोकरीची हमी देऊनच जमीन खरेदी केली जाते. खासगी दलालांनी केलेल्या व्यवहारांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते.
डॉ. होळी यांनी आष्टी येथील पेपर मिलचे उदाहरण दिले. तिथे इल्लूर येथील शेतकऱ्यांनी खासगी व्यक्तींना परस्पर जमिनी विकल्या. मात्र, आता हा उद्योग प्रकल्प बंद पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नोकरीही मिळाली नाही आणि जमिनीही त्यांच्या हातातून गेल्या. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी या दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे सांगत डॉ. होळी यांनी आवाहन केले आहे की, जर असे दलाल तुमच्याकडे आल्यास त्यांना जमीन विकू नका. तुम्ही थेट माझ्याशी किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून या दलालांचे पितळ उघडे पाडावे, असे त्यांनी म्हटले आहे.



