
गडचिरोली : लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी व त्रिवेणी अर्थमुवर्स प्रा.लि. कंपनीतर्फे शासनाने ठरविलेल्या दरानुसार कार्यारंभ आदेश न दिल्यास लोह खनीजाचे वाहतुक पुर्णपणे बंद करून लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आलापल्ली ट्रान्सपोर्ट वेल्फेअर असोसिएशन जिल्हा गडचिरोलीने पत्रकार परिषदेत दिली.
लोहखनीज उत्खननाचे काम त्रिवेणी कंपनीच्या आदेशनुसार ट्रान्स्पोर्टींग त्रिवेदी करतो. दर टनामागे 300 रुपये कमिशन देण्यात येते. आपल्या मर्जीने ट्रकला आर्डर देतात. वर्क ऑर्डर नेहमीच बदलवितात. बेरोजगारांच्या ट्रकला काम नाही. बेरोजगारांना काम द्या अशी विनंती कंपनी व्यवस्थापक एम.डी. प्रभाकरण यांना वारंवार करूनही ट्रान्सपोर्ट वाल्यांना काम नाही. त्यामुळे करोडोच्या ट्रका घेऊनही आम्ही बरोजगार झाले आहोत. आमचे संसार उघड्यावर पडत आहे. आज उपासमारीची पाळी आमच्यावर आली आहे. मात्र राजकीय पुढाऱ्यांच्या ट्रकांना काम दिल्या जाते. एवढेच नव्हे तर केळझर लोह खनीज सॉईड भाजपाच्या मंत्र्याच्या माणसाकडे, बल्लारशा साईड विरोधी पक्षाच्या प्रमुखाच्या माणसाकडे ठेके देऊन राजरोसपणे त्यांच्या करवी काम केले जाते. मात्र ट्रक चालक-मालक बेरोजगारांना डावलल्या जाते अशीही माहिती ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष निकेश गद्देवार व सचिव निच्पिल मंडल यांनी पत्रकारांना दिली.
अन्न व प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी व्हॉईस ऑफ मीडियाच्या सैनिकी स्कुलमध्ये झालेल्या कार्यक्रमात म्हटले होते की, सुरजागड प्रकल्पाच्या कामात स्थानिक बेरोजगारांना काम देऊ. तेही प्रथम विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना व नंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना. आता मात्र स्थानिक ट्रक ट्रान्सपोर्ट वालेच बेराजगार होत आहेत. आम्ही स्वतःचे घर जमीनी विकुन ट्रका खरेदी करून सुरजागड कंपनीकडे कामावर लागलो. परंतु कंपनी आता दररोज नियम बदलवून आम्हाला डावलण्याचा घाट घालत आहे. उलट ओडीसा, बिहार येथील परप्रांतीयांना कामवर घेऊन काम दिल्या जाते. आम्हाला न्याय न दिल्यास आम्ही आमच्यावर नेहमीच होत असलेल्या अन्यायाविरुद्ध जिल्हा वाहतुकदार १६ ऑगस्ट पासुन लोकशाहीच्या मार्गाने लोह खनीजाची वाहतुक बंद पाडू अशा इशाराही ट्रान्सपोर्ट असोसिएशन संघटनेने दिला आहे.
पत्रकार परिषदेला निखिल मंडल, आशिष मेडीवार, गणेश दासलवार, मलरेड्डी येमनूरवार, जमीर शेख, संदिप गुडपवार, किशोर रापेल्लीवार, सहीत बहुसंख्य वाहतुकदार उपस्थित होते.



